मुंबई : प्रतिनिधी
मागील आमदारकीच्या काळात मी वरळीत अनेक कामे केली आहेत. त्यामुळे यावेळी नक्कीच माझ्यावरती विश्वास टाकून माझ्या बाजूने कौल देतील, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला.
दरम्यान, मुंबईतील विधानसभा मतदारसंघ हा अतिशय चर्चेतला विधानसभा मतदारसंघ आहे. कारण येथे तिरंगी लढत होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा तर मनसेकडून संदीप देशपांडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे येथे तिरंगी लढत होणार असून, चुरशीचा सामना होऊ शकतो. त्यामुळे विजयी कोण होणार? वरळीकर कोणाच्या बाजूने कौल देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कौटुंबिक निवडणूक नाही
माहीम मतदारसंघातून तुमचे बंधू अमित ठाकरे निवडणूक लढवत आहेत, तर दुसरीकडे वरुण सरदेसाई हे वांद्र्यातून निवडणूक लढवत आहेत, यांना शुभेच्छा काय द्याल, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारला असता ते म्हणाले, हे बघा ही आमची निवडणूक म्हणून आम्ही लढवतोय. त्यामध्ये कोणतेही कौटुंबिक नाते आणत नाही. आम्ही जनतेसाठी निवडणुकीला सामोरे जातोय. त्यामुळे नक्कीच राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार येईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.