मुंबई : पोलिसांची वर्दी अंगावर असताना पोलिस कर्मचा-यांनी ढोल-ताशाच्या तालावर नाचणे टाळावे, अन्यथा संबंधित कर्मचा-यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशा सूचना मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये आजपासून गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे. यामुळे पुढील दहा दिवस बाप्पाच्या भक्तीत गणेशभक्त तल्लीन झालेले पहावयास मिळणार आहेत. गणेशोत्सवाच्या आनंदाला गालबोट लागू नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जात असून, या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बाप्पाच्या आगमन आणि विसर्जनाला मिरवणुकींचा वेगळाच थाट असतो.
मुंबई पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार, पोलिसांनी ढोल-ताशाच्या तालावर गणवेशामध्ये असताना नाचणे टाळावे. दरम्यान, कुणीही मुंबई पोलिस कर्मचारी थिरकताना दिसल्यास त्याच्यावर कारवाई होऊ शकते. वर्दीचा मान राखण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आणि बंदोबस्ताच्या आढावा बैठकीमध्ये मुंबई पोलिस आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी त्यांच्या कामामध्ये प्रामाणिकपणे लक्ष घालावे, कुठेही गैरप्रकार घडणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले .