लातूर : प्रतिनिधी
देवणी तालुक्यातील मौजे वलांडी येथील अत्यंत गरीब, मागासवर्गीय कुटुंबातील ६ वर्ष वयाच्या लहान मुलींवर निर्दयी आरोपीने अत्याचार केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ दि. ५ फेब्रुवारी रोजी लातूर शहरात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. आरोपीस फह्याशीची शिक्षा द्यावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना देण्यात आले.
हिंदू जन आक्रोश मोर्चा सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गंजगोलाईतून निघाला. हनुमान चौक, महात्मा गांधी चौक, लोकमान्य टिळक चौक मार्गे हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जुने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तेथे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
पिडीत कुटुंबीयास शासनाच्या वतीने समाजकल्याण विभाग, मनोधैर्य योजनेतंर्गत आर्थिक मदत करण्यात यावी, पिडीत बालिकेच्या पुनर्वसनाचा (शैक्षणिक आदी) संपूर्ण खर्च शासनाने उचलावा, सदरचे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा, विशेष सरकारी वकील म्हणून अँड उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी, पिडीत कुटुंबियात अल्पवयीन ४ मुली, १ मुलगा असल्याने सर्व बालकांना बाल संगोपन योजने अंतर्गत (विशेष बाब म्हणून) मदत करण्यात यावी, समाजकल्याण विभाग अंतर्गत पिडीत कुटुंबीयास उदरनिर्वाहासाठी शेत जमीन देण्यात यावी, माता रमाई घरकुल योजने अंतर्गत घरकुलाचा लाभ देण्यात यावा, संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागे पर्यंत आरोपीला गाव बंदी करण्यात यावी जेणेकरुन गावात धार्मिक, जातीय तेढ अथवा तणाव निर्माण होणार नाही याची काळजी प्रशासनाच्या वतीने घेण्यात यावी.
पिडीत कुटुंबीयास न्याय मिळवून आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. सदर निवेदनाची प्रत माहितीस्तव पोलिस अधिक्षक, लातूर, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी, लातूर, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी, लातूर यांना देण्यात आली आहेत जुने जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे महिलांनी प्रातिनिधिक स्वरूपात निवेदन वाचन करुन निवेदन देण्यात आले आहे.