30.9 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeलातूरवलांडी रुग्णालयात रुग्णांची हेळसांड

वलांडी रुग्णालयात रुग्णांची हेळसांड

देवणी : बाळू तिपराळे

तालुक्यातील प्रमुख बाजारपेठेचे केंद्र असलेल्या वलांडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून, दिवसेंदिवस या केंद्रात उपचारासाठी येणा-या रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या चार वर्षापासून ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव पाठपुराव्या अभावी लालफितीत अडकला आहे. त्यामुळे उपचारासाठी येणा-या रुग्णांची हेळसांड होत असून, प्रस्तावाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात व्हावे, यासाठी वलांडी ग्रामपंचायत, नागरिकांसह लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा अनेक वर्षापासून सुरू आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आठ उपकेंद्र असून, त्यात ३३ गावांचा समावेश आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीत व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चार वर्षांपूर्वी मंजूर करून जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत मंजुरीसाठी आरोग्य विभागाकडे पाठविला आहे. मात्र निर्णया अभावी शासन स्तरावर हा प्रस्ताव रखडला आहे.

दिवसेंदिवस या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणा-या रुग्णांची गैरसोय होत आहे. वलांडी हे मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असून, प्राथमिक आरोग्य केंद्रात शेजारच्या कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील रुग्णासह वलांडी परिसरातील ३० ते ३५ गावातील नागरिकांची ये जा असते. प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात होण्याची गरज असल्याने प्रस्ताव मंजूर करण्याबाबतचा ठराव दोन वर्षांपूर्वी वलांडी ग्रामपंचायत व देवणी पंचायत समितीच्या वतीने मंजूर करून पुन्हा एकदा नव्याने राज्याच्या आरोग्य विभागाकडे देण्यात आल्याची माहिती वलांडीच्या सरपंच राणीताई भंडारे व माजी सरपंच राम भंडारे ग्रामविकास अधिकारी माधव सगर यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR