मंचर : प्रतिनिधी
सध्या उष्णतेच्या तीव्रतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढले असून, डिंभे धरणातील पाणीसाठा केवळ १३ टक्क्यांवर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर शेती सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे मी स्वत: पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मीना शाखा व घोड शाखेला पाणी सोडण्याबाबत विनंतीचे पत्र दिले असून, लवकरच या कालव्यांना पाणी सोडले जाईल, अशी माहिती माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
मंचर (ता. आंबेगाव) येथे शरद सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत वळसे पाटील बोलत होते. यावेळी भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, संचालक दादाभाऊ पोखरकर, युवा नेते राजेंद्र गावडे, माजी सभापती प्रकाश घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.
मला स्टंट करण्याची गरज नाही : वळसे पाटील
डिंभे डाव्या कालव्यातून घोड शाखेला गेल्या काही दिवसांपासून पाणी सोडले जात नसल्यामुळे काही राजकीय नेत्यांनी कळंब येथे आंदोलन केले होते. या संदर्भात विचारले असता वळसे पाटील म्हणाले, ‘फोकसमध्ये राहण्यासाठी काहीतरी स्टंट करणं मला आवडत नाही.’