पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतर, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी आज स्वारगेट बसस्थानकात घुसून, सुरक्षारक्षकांची केबिन फोडली. सुरक्षारक्षकांच्या केबिनबाहेर, स्वारगेट बसस्थानक परिसरात शेकडो कंडोम पडलेत, म्हणजे इथे दररोज बलात्कार होतात, मग इथे सुरक्षारक्षकांची केबिन कशाला आहे? असे सवाल करत, वसंत मोरे यांनी सुरक्षारक्षकांची केबिन फोडली.
आजच्या या घटनेला जर कुणी कारणीभूत असेल तर ते सुरक्षारक्षक आहेत. या ठिकाणी २० सुरक्षारक्षक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या घटनेमध्ये सुरक्षारक्षक सामील आहेत असा आरोप वसंत मोरे यांनी केला.
वसंत मोरे म्हणाले की, या ठिकाणी सुरक्षारक्षक करतात काय? बंद असलेल्या शिवशाही एसटीमध्ये शेकडो कंडोम्स दिसतात. त्या ठिकाणी महिलांच्या साड्या, अंतर्वस्त्र, दारूच्या बाटल्या, बेडशीट सापडले आहेत. त्यामुळे सुरक्षारक्षकांच्या संमतीने रोज हे प्रकार घडत आहेत. सुरक्षारक्षकच या प्रकारामध्ये सामील आहेत. या बंद बस आहेत त्या ठिकाणी सुरक्षारक्षकांच्या कार्यालयासमोरूनच जावं लागतं. तरीही अशा घटना कशा घडतात?
परिवहन मंत्री काय करतात?
सुरक्षारक्षकांची एवढी संख्या असताना, चहूबाजूने बंदिस्त असताना या घटना कशा घडतात? असा प्रश्न वसंत मोरे यांनी विचारला आहे. या घटनेची माहिती आगारप्रमुखाला माहिती नाही म्हटल्यावर काय म्हणायचे? आगारप्रमुख आणि या ठिकाणी असलेल्या सुरक्षारक्षकांवर कारवाई झाली पाहिजे. नाहीतर आम्ही कायदा हातात घेऊ, असा इशारा वसंत मोरे यांनी दिला.