वसमत : प्रतिनिधी
हिंगोली जिल्ह्याला सलग बसत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र थांबताना दिसत नाही. वसमत तालुक्यासह संपूर्ण जिल्हा सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे पुन्हा एकदा भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी हादरला. मंगळवारी पहाटे ४:४५ वाजेच्या सुमारास ३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे. अवघ्या १२ तासांत दोन मोठे धक्के बसल्यामुळे पांगरा शिंदे परिसरासह संपूर्ण तालुक्यातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोमवारी (१५ जून) रात्री ९:२० मिनिटांनी पांगरा शिंदे आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचा पहिला धक्का जाणवला. या धक्क्यामुळे भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी संभाव्य धोका ओळखून पूर्ण रात्र जागून काढली. हा थरार संपत नाही तोच, दुस-या दिवशी म्हणजेच मंगळवारी (१६ जून) पहाटे ४:४५ वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा ३ रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा मोठा धक्का बसला. एकापाठोपाठ एक बसलेल्या या धक्क्यांमुळे नागरिक जीव मुठीत धरून घराबाहेर पळाले.
प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन…
सततच्या भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सोमवारी रात्री बसलेल्या धक्क्याची अधिकृत नोंद झाली नसली, तरी मंगळवारी पहाटे ४:४५ वाजता बसलेल्या धक्क्याची तीव्रता ३ रिश्टर स्केल इतकी मोजली गेली आहे. घरांना तडे गेले असल्यास किंवा जुनी बांधकामे असल्यास नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी. भूकंप सदृश परिस्थिती जाणवल्यास उघड्या मैदानात किंवा सुरक्षित जागी आश्रय घ्यावा.
















