जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील वांजरवाडा परिसरामध्ये मोठा पाऊस झाला , दुपारी २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान अक्षरशा वांजरवाडा परिसराला पावसाने झोडपून काढले. या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्याला पूर आला तर शेतीमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले होते. या झालेल्या मुसळधार पावसामुळे वांजरवाडा ते होकर्णा दरम्यान जोडणा-या नदीवरील पुलावरून पाणी जात असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक जवळपास दोन तास बंद होती .
या झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी शेतीमध्ये शिरल्यामुळे नदीकाठच्या शेतीचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील वांजरवाडा, होकर्णा, शेलदरा, वडगाव, केकतशिंंदगी , उमरदरा , चाटेवाडी , या गावांमध्ये मुसळधार पाऊस झाला यामुळे पहिल्यांदाच नदी नाल्यांना पूर आला. नदीकाठच्या शेतीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या परिसरातील शेतक-यांंनी केली आहे.