मुंबई : प्रतिनिधी
राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत सातत्याने वाढ होत असल्याचे बघायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईत एका रिक्षा चालकाने एका तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकावर एका महिलेवर हमालाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला उत्तराखंडमधून आपल्या मुलासोबत मुंबई फिरण्यासाठी आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला शनिवारी रात्री आपल्या नातेवाईकांकडे जाणार होती. त्यामुळे काही वेळासाठी ती वांद्रे स्थानकावर झोपली. यावेळी तिकिट तपासण्याच्या बहाण्याने एक २७ वर्षीय हमाल महिलेजवळ आला. त्याने तुमच्याकडचे तिकिट दाखवा, असे म्हणत महिलेला बाजूला असलेल्या एका मोकळ्या रेल्वेच्या डब्यात नेलं.
यावेळी आरोपीनं जबरदस्तीने महिलेवर अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित महिलेने रेल्वे पोलिसांकडं धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या.