22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रवाघनखे छ. शिवाजी महाराजांचीच !

वाघनखे छ. शिवाजी महाराजांचीच !

– अकारण शंका उपस्थित करणे अयोग्य : मुनगंटीवार

मुंबई : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज हा आमच्या आस्थेचा, स्वाभिमानाचा आणि जिव्हाळ््याचा विषय आहे. लंडनहून येणा-या वाघनखांसंदर्भात राज्यातील जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून ही वाघनखे महाराजांचीच असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत स्पष्ट केले.

विधानसभेत गुरुवारी भाजपा सदस्य रणधीर सावरकर यांनी लंडनवरून आणण्यात येणारी वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराजांची असण्याबाबत बाहेर जी संभ्रम पसरविणारी चर्चा सुरु आहे, यावर सांस्कृतिक कार्य मंत्र्यांनी निवेदन करण्याची मागणी केली. यावर सविस्तर स्पष्टीकरण करताना मुनगंटीवार यांनी अकारण संभ्रम निर्माण करू नका, असे आवाहन केले. लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अलबर्ट संग्रहालयात असलेल्या वाघ नखाबाबत विविध पुरावे उपलब्ध आहेत. लंडनवरून आणण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचे प्रदर्शन येत्या १९ जुलै रोजी साता-यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात करण्यात येत असून, तेथे जोरदार स्वागत होणार आहे.

लंडनमधील संबंधित संग्रहालयात अनेक वाघनखे आहेत हे खरे असले तरी केवळ या विशिष्ट वाघनखांनाच १८२५ मध्ये विशेष पेटीचे आवरण बनविण्यात आले आहे आणि त्यावर ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखान वधासाठी वापरल्याचा स्पष्ट उल्लेख आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. तरीही आम्ही अनेक इतिहास संशोधकांकडून महिती घेतली की जगात कुठे इतरत्र अशी वाघनखे आहे.

लंडनवरून येणारी छत्रपती शिवाजी महाराजांची ही पवित्र वाघनखे येत्या १९ जुलैपासून साता-यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात प्रदर्शित केली जाणार असून जनतेला त्याचे दर्शन घेता येईल. या सोबतच या संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्रे प्रदर्शित करणा-या एका शस्त्र दालनाचेही उद्घाटन करण्यात येणार आहे. वाघनखे आणण्याकरता एक नवीन पैशाचेही भाडे दिले जाणार नाही. यासंदर्भातील अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये. ही वाघनखे आणण्याकरता विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या एका दिवसाच्या खर्चापेक्षाही कमी म्हणजे केवळ १४ लक्ष आठ हजार रुपयांचा खर्च करार करण्याकरिता जाण्यायेण्याचा झाला आहे, अशी माहितीही सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR