सध्या महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना अन्नाची गरज नाही असे दिसते. त्यांना एखादा ‘वाद’ चघळायला दिला की त्यावरच त्यांचे पोट भरते. त्यांच्याबरोबरच प्रसारमाध्यमाचेही पोट भरते. ‘इडियट बॉक्स’ वरील चॅनेलवाल्यांना दिवसभर काय दाखवावे याची भ्रांत उरत नाही. महाराष्ट्रात रोज नवे वाद निर्माण होत आहेत, केले जात आहेत. त्यातच राजकीय नेते समाधानी आहेत. नुकताच कुणाल कामरा वाद पेटला आहे. त्याआधी औरंगजेबाची कबर गाजली. आता वाघ्या श्वानाचे स्मारक गाजतेय. विविध वादांच्या गदारोळात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, बेरोजगारी, वाढती महागाई, शेतक-यांच्या आत्महत्या असे अनेक गंभीर प्रश्न खड्ड्यात फेकले गेले आहेत. हे सारे पाहिल्यानंतर महाराष्ट्र ही वादांची जननी आहे काय असा प्रश्न पडतो. एक वाद धुमसत असतानाच दुसरा वादही हळूच डोके वर काढतो. कुणाल कामरा वादाचे कवित्व सुरू असतानाच ‘वाघ्या’ श्वानाचा वाद पेटला असून, या वादात उडी घेणारे एकमेकावर भुंकत आहेत. महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावरील वाघ्या श्वानाच्या स्मारकाबाबत काही दिवसांपासून वाद धुमसत आहे. हे स्मारक काढून टाकावे अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. या मागणीला धनगर समाज व विरोधी पक्षांनी विरोध केला. त्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या स्मारकाबाबत पुरावा नसल्याची कागदपत्रे दिल्लीत पत्रकार परिषदेत मांडली आणि हे स्मारक हटवावे अशी पुन्हा मागणी केली.
संभाजीराजे म्हणाले, पुरातत्व खात्याने माहितीच्या अधिकारात स्पष्टपणे सांगितले आहे की, वाघ्या श्वानाच्या स्मारकाची सुरक्षित स्थळांच्या यादीत कुठेही नोंद नाही. ‘राजसंन्यास’नाटकातून वाघ्या श्वानाची दंतकथा निर्माण झाली आहे. त्यामुळे वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवावे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ वाघ्या श्वानाची समाधी आहे. या समाधीची उंची छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपेक्षाही जास्त आहे. याआधीही अनेकवेळा वाघ्या श्वानाच्या समाधीला कोणताही ऐतिहासिक संदर्भ नसल्याचा मुद्दा अनेक शिवप्रेमींनी उपस्थित केला होता. आता छत्रपती घराण्याचे १४ वे वंशज संभाजीराजे छत्रपतींनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्याचे स्मारक हटवण्यात यावे अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. मात्र, त्यांच्या या मागणीला भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि संपूर्ण धनगर समाजाने विरोध केला आहे. वाघ्याचे स्मारक १९३६ ला पूर्ण झाले. २०३६ पर्यंत हे स्मारक काढले नाही तर त्याची नोंद संरक्षित स्थळांच्या यादीत होईल अशी माहिती पुरातत्व विभागाने दिली आहे. त्यामुळे या विषयावर मी आता बोलत आहे. मी सरकारला ३१ मेचा अल्टिमेटम दिलेला नाही.
कारण राज्य शासनाचे धोरण सांगते की, ३१ मे पर्यंत गडकोटावरील अतिक्रमण काढावे. त्यामुळे मी विनंती केली की, ज्या वाघ्या श्वानाचे पुरावे नाहीत ते सुद्धा ३१ मे पर्यंत काढून टाका. वाघ्याच्या समाधीला कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना अग्नी दिला जात होता तेव्हा वाघ्याने त्यात उडी घेतल्याचे कोणतेही ऐतिहासिक पुरावे नाहीत. वाघ्याचे स्मारक का उभे राहिले यावर अनेक वाद आहेत. महाराष्ट्रातील एकाही इतिहासकाराने वाघ्याचे ऐतिहासिक संदर्भ आहेत असे म्हटलेले नाही. ‘राजसंन्यास’ नाटकातून एक दंतकथा निर्माण झाली. या नाटकाने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली. याच नाटकाने वाघ्याची दंतकथा निर्माण केली आणि त्याचे स्मारक बांधण्यात आले. दुर्दैवाने तुकोजीराव होळकर महाराजांचे नाव तिथे जोडले जात आहे. त्यांनी या स्मारकासाठी मदत केली असे म्हटले जात आहे. मल्हारराव होळकर, यशवंत होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी स्वराज्य स्थापनेसाठी योगदान दिले. अशावेळी तुकोजीराव महाराज वाघ्याच्या (श्वानाच्या) समाधीला मदत कशी करतील असा सवाल संभाजीराजेंनी केला. छत्रपती घराण्याचे आणि होळकर घराण्याचे जुने संबंध आहेत. असो. पुरोगामी महाराष्ट्रात अलिकडे मुद्दामहून काही वाद उकरून काढले जात आहेत. औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे आहे.
या कबरीला चारशेहून अधिक वर्षे झाली आहेत. या चारशे वर्षांत या कबरीला हटवण्याचे प्रयत्न कुणीही केले नाहीत.इतकेच काय पण छत्रपती संभाजीराजे यांची क्रूरपणे हत्या झाल्यानंतरही एकाही मराठा सरदाराने अथवा त्यानंतर पेशव्यांनाही ही कबर हटवावी असे वाटले नाही. मग आजच ही कबर हटवावी असे का वाटते? रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ असलेल्या वाघ्या श्वानाचे स्मारक काढून टाका. त्याला कोणताही ऐतिहासिक संदर्भ नसल्याचा दावा संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. वास्तविक पाहता वाघ्याचे स्मारक अनेक शतकांपासून तिथे आहे. परंतु कोणासही ते स्मारक काढावे असे वाटले नाही. मुळात स्मारक उभे करताना कुणाचा विरोध झाला नाही. मग आताच विरोध कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतो. काही चुकीच्या गोष्टी असतील तर नक्कीच त्या दुरुस्त केल्या जाव्यात. वाघ्याचे स्मारक एक दंतकथा असेल तर ते काढून टाकण्यास हरकत नाही. कारण चुकीचा इतिहास असेल तर तो दुरुस्त केलाच पाहिजे. मात्र, अलिकडे काही वर्षांपासून या बाबी सातत्याने पुढे का केल्या जात आहेत असा प्रश्न भेडसावू लागतो. वाघ्याचे स्मारक हटवण्याचा प्रयत्न झाल्यास न्यायालयात जाऊ असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. म्हणजे त्यावरून नवा वाद निर्माण होणार! खरे तर पुरोगामी महाराष्ट्राने आपसातील वाद शांततेने सोडवण्याची खरी गरज आहे.
त्यासाठी विनाकारण आक्रमक होऊन दोन समाजातील एकोपा नष्ट करण्याचे पातक का करायचे? महाराष्ट्र अशांत राहिला तर त्याचे दुष्परिणाम सर्वसामान्य जनतेलाच भोगावे लागतात. म्हणून कोणतेही वादग्रस्त प्रश्न असले तरी ते शांततेच्या मार्गानेच सोडवण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण करण्याची गरज नाही. औरंगजेब हा क्रूर शासक होता. त्यामुळे त्याच्याविषयी कुणाच्या मनात ममत्व अथवा लळा असण्याचे कारण नाही. वाघ्या श्वानाच्या स्मारकाबाबत एखादी दंतकथा असेल तर बिघडले कुठे? त्याच्या इमानदारीबद्दल तर शंका घेण्यास जागा नाही ना! श्वानाची इमानदारी आपण आजही अनुभवतो आहोतच. मग एखादी दंतकथा दंतकथाच राहू द्या ना!… चल रं वाघ्या रडू नको…. पाया कुणाच्या पडू नको… दुनिया सारी कधी उलटली न मला कधी सोडू नको!