29.7 C
Latur
Tuesday, March 25, 2025
Homeमहाराष्ट्रवाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याला हात लावाल तर गाठ आमच्याशी

वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याला हात लावाल तर गाठ आमच्याशी

संभाजीराजेंच्या अल्टिमेटमनंतर धनगर समाजाचा इशारा

बीड : रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याच्या संभाजीराजे छत्रपती यांच्या मागणीविरोधात बीडमध्ये धनगर समाज आक्रमक झाला आहे. अहिल्यादेवींच्या जयंतीची तारीख निवडून महाराष्ट्रात दंगल घडवायची का? छत्रपतींनी राज्यात असंतोष पसरवण्याचे काम करू नये, तसेच वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याला हात लावाल तर गाठ आमच्याशी आहे, असा थेट इशारा धनगर समाजाचे नेते बाळासाहेब दोडतले यांनी दिला आहे. तसेच आता संभाजीराजे छत्रपती यांनी अल्टिमेटम दिल्यानंतर ओबीसी समाजाचे नेते आक्रमक झाल्याचे पहायला मिळते.

दरम्यान, सध्या राज्यात विविध मुद्यांवर राजकारण सुरू आहे. हिंदवी स्वराज्याची राजधानी असणा-या किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीनजीक कोणतेही ऐतिहासिक संदर्भ नसलेली वाघ्या कुत्र्याची समाधी ३१ मे पूर्वी शासनाने हटवावी, अशी मागणी रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिष्ठा पणाला लावून काढायला का लावलं?

वाघ्या कुत्र्याचे इतिहासात खूप मोठे योगदान आहे. होळकर यांनी जीर्णोद्धार केला म्हणून हा मुद्दा पुढे घेऊन आलात का? असा सवाल देखील बाळासाहेब दोडतले यांनी विचारला. श्रीक्षेत्र माहुली येथे खंड्या नावाच्या कुत्र्याचा पुतळा कसा चालतो? रायगडावर तुमची मक्तेदारी नाही. इतिहास संपवण्याचं पाप आपण करू नये, असे बाळासाहेब दोडतले यांनी संभाजीराजे यांना म्हटले आहे. ३१ मे ची तारीख का निवडली? त्यादिवशी अहिल्यादेवींची जयंती आहे, या दिवशी महाराष्ट्रात दंगल घडवायची का? असा सवाल बाळासाहेब दोडतले यांनी विचारला आहे.

हाकेंची संभाजीराजेंवर टीका
दरम्यान, रायगड प्राधिकरण समितीवरून संभाजीराजे यांची हकालपट्टी करा, अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुण्यात केली आहे. संभाजीराजे महाराष्ट्रातील वातावरण दूषित करत आहेत. संभाजीराजेंनी ३१ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिल्याने महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR