लातूर : प्रतिनिधी
येथील संत कबीर प्रतिष्ठान व महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व संत कबीर प्रतिष्ठान चा रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त त्रैभाषिक कवी संमेलन २९ मार्च रोजी भालचंद्र ब्लंड बँकेच्या सभागृहात डॉ. रणजीत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व उद्घाटक कवयत्री व शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, हिंदी चे कवी प्रकाश निहलानी, आशिष नागला, दक्खणी कवी डी. के. शेख, मराठीचे प्रख्यात कवी नारायण पुरी व योगीराज माने, प्रतिष्ठानचे सचिव डॉ. दिलीप गुंजरगे यांच्या उपस्थितित संपन्न झाले.
उद्घाटन प्रसंगी तृप्ती अंधारे म्हणाल्या मनुष्याच्या मनात अतृप्त इच्छा आकांक्षाशेला अंतचं नसतो, जीवनात सुखा पेक्षा पुढची आनंद अनुभूती आहे यातच जीवनाची तृप्ती आहे. ही तृप्ती काव्यानंदातुन मिळते. कविता लिहिने वाचने व कविता जगणे याची अनुभूती वेगळी असते. मानसाला कवीते नुसार जगता आले पाहिजे, संत कबीर प्रतिष्ठान वाचकांची नाळ काव्य संमेलनातून साहित्यकांशी जोडत आहे याचा सार्थ अभिमान आहे. संत कबीरांच्या मानवतावादी विचारा सोबत हिंदी राष्ट्रभाषेचा प्रचार प्रतिष्ठान करत आहे असे संबोधित केले. अकादमीचे सदस्य डॉ. सतीश यादव यांनी महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या कार्याचा आढावा घेतला. कवी प्रकाश निहलानी यांनी आजच्या समाजाचे वास्तव मांडून हास्य-व्यंग्य कविता सादर करून श्रोत्यांची मने जिकंली, शेतक-यांची आत्महत्या, आजची फॅशन अनेक विषयावर हृदयस्पर्शी कवितेतून मानवी जीवनाच्या वास्तवावर प्रकाश टाकला. दक्खनी कवी डी. के. शेख यांनी दोन कुत्ते ही गजल सादर श्रोत्यांची मने जिंकली.
मराठीचे प्रख्यात कवी नारायण पुरी यांनी श्रमाचं मूल्य बाजूला ठेवून अपेक्षा ठेवणारी जनता व शासनाची योजनांच्या माध्यमातून होणारी दमछाक याच्या सह, स्त्रीयांवर विशेषत: बालिकेवर होणा-या अत्याचारा बद्दल चिंता व्यक्त केली. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्रात बालिकेवर नराधम अत्याचार करत असतील तर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करण्याचा अधिकार कोणी दिला अशा संदेश देणा-या कविता सादर करून रसिकांची दाद मिळवली.
युवा कवी आशिष नागला यांनी कवितांचे भावविश्व श्रोत्या समोर मांडले. कवी योगीराज माने यांनी हिंदी मराठी कवितेच्या माध्यमातून नागरीकांच्या व्यथा मांडल्या. अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. रणजीत जाधव यांनी कबीर प्रतिष्ठानच्या स्थापनेचा उद्देश विशद करून मागील २५ वर्षाच्या कार्यावर प्रकाश टाकला. प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. प्रभाकर स्वामी व अकादमीचा नंददुलारे वाजपेयी समीक्षा पुरस्कार प्राप्त डॉ. बालाजी भूरे यांचा शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ दिलीप गुंजरगे, सुत्रसंचलन योगीराज माने, विवेक सौताडेकर तर आभार प्रा. राजेश विभुते यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कबीर प्रतिष्ठानच्या पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.