लातूर : प्रतिनिधी
मकर संक्रांत हा सण लातूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सणानिमित्त महिला एकमेकांना वाण म्हणून भेटवस्तू देत असतात. परंतु, वसुंधरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांना वाण म्हणून तुळशीच्या रोपांचे वितरण करण्यात आले. या माध्यमातून वृक्ष लागवड आणि संवर्धन ही काळाची गरज आहे, हा संदेश देण्यात आला. शिवाय, यावेळी महिलांनी वृक्ष संवर्धनाची शपथ घेत अनोख्या पद्धतीने संक्रांत सण साजरा केला.
मकर संक्रात या सणाचे औचित्य साधून एकमेकांना तिळगुळ देत शुभेच्छा दिल्या जातात. शिवाय, या सणा निमित्ताने महिला एकमेकींना आपल्या घरी आमंत्रित करुन वाण म्हणून भेटवस्तू देण्याची भारतीय संस्कृती आहे. प्रत्येक सण आणि उत्सवाला पर्यावरण रक्षणाची जोड देण्याकरिता वसुंधरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रत्येक सण हा पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा केला जातो. यामध्ये प्रामुख्याने झाडाचा गणपती, झाडांचे वाढदिवस, झाडांशी मैत्री अभियान, सेल्फी विथ ट्री, वाढदिवस निमित्ताने बुके भेट देण्याऐवजी वृक्ष भेट परंपरा, असे नानाविध उपक्रम प्रतिष्ठानतर्फे राबविले जातात. मकर संक्रांत या सणाचे औचित्य साधून लातूर शहरातील जुना अऔसा रोड परिसरातील श्री कालिकादेवी मंदिरमध्ये उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत महिलांना वाण म्हणून तुळशीचे रोप भेट देण्यात आले. शिवाय यावेळी महिलांना निसर्ग रक्षण काळाची गरज, अशी शपथ देण्यात आली. या उपक्रमाला महिलांनी भरभरुन प्रतिसाद देत वृक्ष संवर्धनासाठी आम्ही नक्कीच पुढाकार घेऊ, असे यावेळी सांगितले. वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष योगेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कालिकादेवी देवस्थान समितीचे अध्यक्ष दीक्षित, सर्व पदाधिकारी यांच्यासह प्रतिष्ठानचे वृक्ष लागवड-संवर्धन अभियान प्रमुख राहुल माशाळकर, महिला प्रमुख प्रिया मस्के, सदस्या श्रद्धा मोरे,
शिल्पा सूर्यवंशी, अंकिता कदम, मनिषा कदम, सुदेक्षणा मोहिते आदींनी परिश्रम घेतले.