लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यात आलेल्या वादळी वा-यासह अवकाळी पावसाने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. आंब्यासह इतर फळबागा, फुलशेती, भाजीपाला आणि ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन शासनाने शेतक-यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी लातूर तालुका काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने तहसीलदार सौदागर तांदळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन दि. १४ मे रोजी देण्यात आले आहे.
माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी दिलेल्या सुचनेच्या अनुषंगाने लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वैजनाथ शिंदे, इंदिरा सुत गिरणीचे व्हाईस चेअरमन धनराज पाटील, लातूर तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभाष घोडके, उपसरपंच आनंद पवार आणि भारत झुंजे पाटील यांनी हरंगुळ खु. येथील शेतकरी महादेव झुंजे-पाटील, बस्वराज झुंजे-पाटील आणि भारत झुंजे-पाटील यांच्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. गावातील शेतकरी राहूल जाधव यांचा वीज पडून मृत्यू झाला आहे, त्याची माहीती घेतली. सर्व शेतक-यांना तात्काळ पंचनामे करुन शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन देत धीर दिला.
यावेळी लातूर तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभाष घोडके, दगडूसाहेब पडिले, शिवाजी देशमुख, आप्पासाहेब धडे, संजय पाटील खंडापूरकर, सहदेव मस्के, श्रीनीवास शेळके, पंडित ढमाले, पांडुरंग वीर पाटील, बालाजी वाघमारे, राहुल सुरवसे यांच्यासह लातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.