केज : प्रतिनिधी
खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीसमोर शरण येताच पुण्यात प्राथमिक चौकशी करून सीआयडीच्या पथकाने रात्री केज येथे आणले. तेथे पोलिस स्टेशनमध्ये हजर करून न्यायालयात दाखल केले. तेथे रात्री उशिरा सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद रात्री उशिरापर्यंत सुरू होता. तत्पूर्वी केज रुग्णालयात त्यांची तपासणी करण्यात आली.
दरम्यान, केज न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये वाल्मिक कराड यांचे समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र पोलिसांनी कारवाई करण्याचा इशारा देऊन सर्व कार्यकर्त्यांना न्यायाल्यासमोरून हुसकावून लावले. केज न्यायालय आणि केज पोलीस स्टेशनसमोरील संपूर्ण रस्ता पोलिसांमार्फत निर्मनुष्य केला. या मार्गांवरील वाहतूक सुरु असली तरी रस्त्यावर कोणी थांबणार नाही याची खबरदारी पोलिसांनी घेतली.
दरम्यान, वाल्मीक कराडचे वकील अशोक कवडे कोर्टात दाखल झाले. त्याचबरोबर सरकारी वकील एस. एस. देशपांडे हेदेखील कोर्टात दाखल झाले होते. कोर्टाच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता. कराड यांना कोर्टात हजर करताच सुनावणी सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत ही सुनावणी सुरू होती.