कराडवर १५ गुन्हे, खंडणीसह सर्व गुन्ह्यांचा तपास करणार
बीड : प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे संपूर्ण राज्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. यासंदर्भात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर थेट आरोप केला जात आहे. त्यातच त्यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात राजकीय नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने अखेर वाल्मिक कराडला अटक झाली असून, त्याने आतापर्यंत केलेल्या सर्व गुन्ह्यांचा तपास केला जात आहे. कराडविरोधात आतापर्यंत एकूण १५ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सर्व गुन्ह्याचा तपास करून कराडच्या गुन्ह्याची कुंडली लवकरच मांडली जाऊ शकते. कारण गुन्हे शाखेने त्याबाबतचा उल्लेख केला आहे.
अनेक गुन्हे असूनही सत्तेच्या जोरावर यंत्रणेला हाताशी धरीत अगदी २ पोलिस अंगरक्षकांसोबत वावरणा-या वाल्मिक कराड याची सगळीच कुंडली बाहेर निघणार आहे. खंडणीतील गुन्ह्यात पोलिस कोठडी मागताना तपास करणा-या गुन्हे अन्वेषणविभागाने न्यायालयासमोर विविध मुद्यांच्या अनुषंगाने चौकशी करावयाची असल्याचे नमूद केले आहे.
वाल्मिक कराडवर यापूर्वीही १५ गुन्हे नोंद आहेत. मात्र, आतापर्यंत सत्तेच्या जोरामुळे यंत्रणा त्याला हात लवत नव्हत्या. परंतु मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पवनचक्की कंपनीला २ कोटी रुपयांची खंडणी मागण्याचे प्रकरण राज्यभर आणि संसदेपर्यंत गाजले. यात गुन्हा नोंद असलेला वाल्मिक कराड २१ दिवस फरार होता. अखेर तो ३१ डिसेंबर रोजी सीआयडीसमोर शरण आला. त्याला त्याच रात्री उशिरा केज न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी कोठडीची मागणी करताना तपास करणा-या गुन्हे अन्वेषण विभागाने विविध मुद्दे मांडले. यामध्ये त्याने खंडणी मागितल्याचे या खंडणी प्रकरणात कोठडीत असेलल्या व खून प्रकरणातही आरोपी असलेल्या विष्णू चाटेने सांगितल्याचे नमूद केले.
गुन्ह्यातून पैसा गोळा
केला का? तपास करणार
यासह खंडणी आणि हत्या प्रकरणातील फरार सुदर्शन घुलेची माहितीही त्याच्याकडून विचारण्यात येत आहे. त्याने यासह इतर आणखी कोणा-कोणाला खंडणी मागितली याचीही चौकशी केली जात आहे. त्याचे सर्व बँक अकाऊंट आणि त्याने अशा गुन्ह्यातून मालमत्ता गोळा केली का, याचाही तपास केला जात आहे, असेही गुन्हा अन्वेषण विभागाने कोर्टात म्हटले होते.
३ फरार आरोपींना
डॉ. वायबसेंची मदत?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपींना पळून जाण्यात डॉ. संभाजी वायबसे यांनी मदत केल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, या प्रकरणी पोलिसांनी आज तिघांना ताब्यात घेतले आहे. यापैकी एक डॉ. संभाजी वायबसे आहेत. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपीना पळून जाण्यात मदत केल्याचा संशय त्यांच्यावर आहे. वायबसे यांची एसआयटीकडून चौकशी सुरू असून चौकशीनंतर आणखी माहिती हाती येऊ शकते.