केज : प्रतिनिधी
केजमधील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने वाल्मिक कराडला १५ दिवसांची सीआयडी कस्टडी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वाल्मिक कराडला धक्का बसला आहे. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला आज केज न्यायालयात दाखल करण्यात आले होते. आज न्यायाधिशांपुढे रात्री उशिरा सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकिलासह वाल्मिक कराडच्या वकिलीने युक्तीवाद केला. यानंतर न्यायालयाने १५ दिवसांच्या कोठडीचा निर्णय सुनावला.
कोर्टात सुनावणीदरम्यान पोलिसांनी वाल्मिक कराडला १५ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली तर कराडच्या बाजूने युक्तिवाद करताना न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर कोर्टाने रात्री साडेबारा वाजता कराडला १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. त्यामुळे कराडला धक्का बसला आहे. कोर्टात सुनावणीअगोदर कोर्ट परिसरात कराड समर्थक आणि विरोधकही जमले होते. त्यामुळे तणावाची स्थिती होती. त्याचवेळी कोर्टाजवळ कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात होता. पोलिसांनी तेथील कार्यकर्त्यांना हुसकावून लावले.
वाल्मिक कराड मंगळवारी दुपारी पुण्यातील सीआयडीसमोर शरण आले. तेथे जुजबी चौकशी करून त्याचा बीडच्या पथकाकडे ताबा देण्यात आला. या पथकाने त्याला रात्री केजमध्ये आणले. केजमध्ये दाखल होताच कराडला रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय तपासणी करून केज पोलिस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले. तेथून थेट केज न्यायालयात हजर केले. तेथे दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाला. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने कराडला १५ दिवसांच्या कोठडीची मागणी केली तर कराडच्या वकिलांनी त्यांना कोठडी देण्याची आवश्यकता नाही. कारण त्यांना राजकीय हेतूने बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे कराड यांना केवळ न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी केली.
दरम्यान, केज न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. यामध्ये वाल्मिक कराड यांचे समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही गटाचे कार्यकर्ते हजर होते. मात्र पोलिसांनी कारवाई करण्याचा इशारा देऊन सर्व कार्यकर्त्यांना न्यायालयासमोरून हुसकावून लावले. केज न्यायालय आणि केज पोलिस स्टेशनसमोरील संपूर्ण रस्ता पोलिसांमार्फत निर्मनुष्य केला जात आहे.