पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांची विदर्भातील वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने नुकतीच एका पत्राद्वारे ही नियुक्ती जाहीर केली आहे. या जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.
महायुती सरकारमध्ये वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) यांच्या वाट्याला आले आहे. यानुसार या पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी याआधी ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ यांची निवड केली होती.
या निवडीनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या निवडीची घोषणा केली होती. या निवडीत हसन मुश्रीफ यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु मुश्रीफ यांनी वैयक्तिक कारण देत, या पालकमंत्रिपदाचा निवडीनंतर महिनाभरातच राजीनामा दिला होता. या रिक्त जागेवर भरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.