खिडक्यांची तावदाने फुटली, नागरिकांत घबराट, बॉम्बशोधक पथक दाखल
वाशी : प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलिस स्टेशनच्या आवारात आज (८ जानेवारी) सकाळी साडेअकरा ते बाराच्या दरम्यान अचानक स्फोटसदृश गूढ आवाज झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. या स्फोटात खिडक्याची तावदाने फुटली तर इमारतीला तडे गेल्याचे दिसून आले. वाशी येथे लहान-मोठे असे आवाज नेहमीच ऐकू येतात. त्यामुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच बॉम्बशोधक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
वाशी पोलिस स्टेशनच्या पूर्वेकडील बाजूस रोड लगत वस्ती आहे. या भागात दुपारच्या वेळी अचानक स्फोटासारखा गूढ आवाज झाला. हा आवाज झाल्याने जवळपासच्या परिसरातील ५०० फुटावरील खिडक्यांची काचेची तावदाने फुटली. त्यामुळे हा स्फोट असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. कारण या आवाजात वाशी पोलिस ठाण्याच्या इमारतीला तडे गेले तर खिडक्याच्या काचाही फुटल्या.
या स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, वाशी जवळील ५ किलोमीटरच्या अंतरावरील लोकांना तो ऐकू गेला. या स्फोटाच्या ठिकाणी जवळपास कोणीही व्यक्ती नसल्याने जीवित हानी झाली नाही. या घटनेची माहिती वाशी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम थोरात यांनी वरिष्ठांना दिल्यावरुन अतिरिक्त पोलिस उपाधीक्षक हसन गौहार, भूम येथील उपविभागीय अधिकारी गौरी प्रसाद हिरेमठ, राज्य गुप्त वार्ता विभाग, बॉम्ब शोध व नाशक पथक श्वान पथकासह दाखल झाले आणि घटनास्थळाची पाहणी केली.
नमुने प्रयोगशाळेत पाठविले
घटनेची माहिती मिळताच बॉम्बशोधक आणि नाशक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पाहणी केल्यानंतर मिळालेल्या वस्तूंचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले असून अंतिम अहवाल आल्यानंतरच याबाबतचे खरे चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे हा गूढ आवाज नेमका कशाचा, यावरून उलटसुलट चर्चा रंगली आहे.