लातूर : प्रतिनिधी
शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणि प्रमुख चौकांमध्ये होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी आवश्यकतेनुसार सिग्नल आणि पार्किंगचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या. जिल्हास्तरीय रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या.
लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांच्यासह महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.शहरात वर्दळीच्या ठिकाणी बेशिस्तपणे वाहनांचे पार्किंग केले जात असल्याने वाहतुकीची कोंडी होत असल्याचे दिसते.
त्यामुळे प्रत्येक वाहनांसाठी पार्किंगची ठिकाणे निश्चित करावीत. यासाठी महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन विभाग, शहर वाहतूक शाखा यांनी संयुक्तपणे पाहणी करून पार्किंगची ठिकाणे निश्चित करावीत. तसेच प्रमुख चौकांच्या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होवून वाहतूक विस्कळीत होत आहे. अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार सिग्नल कार्यान्वित करावे, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या. वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने होणा-या रस्ते अपघातांचे प्रमाण अधिक आहे. हे अपघात रोखण्यासाठी वाहनधारकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती आवश्यक आहे. याकरिता परिवहन विभाग, वाहतूक पोलीस शाखा, सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तपणे जनजागृती मोहीम राबवावी. यामध्ये वाहनांवर रिफ्लेक्टर लावण्याबाबत सूचना द्याव्यात, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या.