नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील ९० टक्के मोटारींमध्ये आगीच्या प्रतिबंधासाठी ज्या रसायनांचा वापर केला जात आहे, त्यामुळे प्रवाशांना कर्करोग होण्याचा धोका संभवतो. राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयासह चार विभागांना नोटीस पाठवून उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) रसायनांच्या परिणामांची तपासणी करण्यास नकार दिला होता. तपासणीसाठी आवश्यक सुविधा नसल्याचे कारण यासाठी देण्यात आले होते. मात्र ही बाब लोकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने ‘एनजीटी’ने यासंदर्भातील वृत्ताची दखल घेतली असून यावर सुनावणी सुरू केली आहे.
वाहनांच्या आसनातील फोम आणि तापमान नियंत्रित करण्यासाठी करण्यात येणा-या उपायांमध्ये या रसायनाचा वापर होतो. हे रसायन दीर्घकाळ मोटारीत राहिल्याने चालक आणि विशेषत: त्यातून प्रवास करणा-या लहान मुलांना कर्करोग होण्याचा धोका उद्गभवू शकतो, अशी माहिती ‘एनजीटी’ला मिळालेली आहे.
याप्रकरणी ‘सीपीसीबी’ने नुकताच एक अहवाल ‘एनजीटी’कडे दिला आहे. ‘टीसीआयपीपी’, ‘टीडीसीआयपीपी’ आणि ‘टीसीआयपी’ या रसायनांमुळे कर्करोग होतो किंवा नाही, याच्या तपासासाठी ‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे’कडे (आयसीएमआर) सर्व साधने आहेत,असे ‘सीपीसीबी’ने त्यात नमूद केले होते.