लातूर : प्रतिनिधी
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दि. १० एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेने देवणी तालुक्यातील वलांडी गावच्या शिवारात बोंबळी रोडवर सापळा रचून वाहनासह आठ लाख १२ हजार रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त केला आहे. एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यावर कठोर कारवाईची मोहीम राबवित येत आहे. दि. १० एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी देवणी तालुक्यातील वलांडी गावाच्या शिवारातून वाहतूक होणार आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. सदर माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात सदरचे पथक दि. १० एप्रिल रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास वलांडी गावाच्या शिवारात बोंबळी रोडवर सापळा लावून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला ३ लाख १२ हजार रुपयांचा गुटखा व एक मारुती सुझुकी कंपनीची इको कार असा एकूण ८ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रतिबंधित गुटका, सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करीत असलेला बस्वराज विश्वनाथ आग्रे, वय ४४ वर्ष, राहणार हालसी, तालुका निलंगा यांच्याविरुद्ध देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे, नितीन कठारे, राहुल कांबळे यांनी केली आहे.