लातूर : प्रतिनिधी
विकसीत भारताच्या निर्माणासाठी सशक्त्त भारताची गरज असून यासाठी प्रत्येकांनी आपल्या आरोग्याची जपणूक करावी. क्षयरोग हा उपचाराने आणि पोषण आहाराने बरा होतो. त्यामुळे क्षयरुग्णांनी आहार आणि औषधोपचार यात सातत्य ठेवून या आजारावर मात करावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांनी शुक्रवारी येथे केले.
प्रधानमंत्री टीबी मुक्त्त भारत अभियानांतर्गत येथील जिल्हा प्रशिक्षण संघात राज प्रतिष्ठानच्या वतीने ५० क्षयरुग्णांना फूड बास्केटचे वाटप मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदिप ढेले होते. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस. एन. तांबारे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे् सहयोगी प्रा. डॉ. अभिजीत जाधव, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. हिंडोळे, डीटीसी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षवर्धन राऊत, डॉ. डी. के. रुपनर, डॉ. अविनाश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना सोमय मुंडे म्हणाले की, कोणत्याही आजाराला अटकाव करण्यासाठी प्रतिकारशक्त्ती महत्वाची असते. ती असेल तर शरीर उपचाराला साथ देते आणि आजारावर मातही करता येते. प्रतिकारशक्त्ती वाढावी यासाठी राज प्रतिष्ठानने तुम्हाला सकस आहार तर शासनाने प्रभावी औषधे दिली आहेत. ती केवळ नियमीत घेण्याचे काम तुम्हाला करावयाचे आहे. एवढे केलेत तर तुम्ही बरे व्हाल. जनजागृतीने प्रबोधन होते आणि प्रबोधनाने लोकसहभाग वाढतो यामुळे या आजाराबाबतही व्यापक जनजागृती करावी असेही मुंडे म्हणाले. राज प्रतिष्ठानच्या सामाजिक बांधिलकीचे त्यांनी कौतूक केले.
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. तांबारे यांनी क्षयरोग कारणे उपाय व औषधोपचार यावर स्विस्तर माहिती दिली तसेच समाजातील दानशूर व्यक्त्ती, अधिकारी व संस्थांनी क्षयरुग्णांना फुड बॉस्केट (पोषण आहार) देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ढेले यांनी राज प्रतिष्ठानच्या सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाप्रति कृतज्ञता व्यक्त्त करीत हा सेवाभाव ही लोक चळवळ व्हावी यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी निक्षयमित्र म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ढेले व डॉ. हर्षवर्धन राऊत यांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचलन डॉ. हिंडोळे यांनी केले. आभार डॉ. हर्षवर्धन राऊत यांनी मानले.