24 C
Latur
Thursday, July 4, 2024
Homeराष्ट्रीयविकसित भारतासाठी भरभरून प्रयत्न करू

विकसित भारतासाठी भरभरून प्रयत्न करू

पंतप्रधान मोदींची लोकसभेत ग्वाही
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मागील १० वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था १० व्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आणली. देशात गरिबांसाठी तब्बल ४ कोटी घरे बांधली. तसेच २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले. एवढेच नव्हे, तर भारताला मोबाईल फोनचा एक मोठा उत्पादक आणि निर्यातदार बनवले आहे. यापुढेही आम्ही विकसित भारताचा संकल्प घेऊन निघालो आहोत. तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही भरभरून प्रयत्न करू आणि शरीराचा प्रत्येक कण विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी समर्पित करू, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुपारी ४.१५ वाजता राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत गदारोळ सुरू केला. लोकसभा अध्यक्षांनी वारंवार नकार देऊनही विरोधी सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवला. त्यामुळे गोंधळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. त्यामुळे सलग दुस-या दिवशी लोकसभेत गदारोळ पाहायला मिळाला. प्रारंभी पंतप्रधानांनी सर्व नूतन सदस्यांचे अभिनंदन केले आणि आमचे सरकार भ्रष्टाचाराबाबत झिरो टॉलरन्स असल्याचे म्हटले.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी हिंदुत्व, अग्निवीर योजना, नीट परीक्षा प्रकरणावरून भाजपवर जोरदार हल्ला चढविला होता. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत प्रत्युत्तर देत काल बालबुद्धीचा खेळ पाहायला मिळाला असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवरून कॉंग्रेसवर टीका केली. ही निवडणूक जगातील सर्वात मोठी निवडणूक होती. देशाच्या जनतेने आम्हाला तिस-यांदा सेवा करण्याची संधी दिली. जनतेने आमचा १० वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला आहे. २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर काढले. या देशाने तुष्टीकरणाच्या कारभाराचे मॉडेल दीर्घकाळ पाहिले आहे. २०१४ पूर्वी दररोज घोटाळ््याच्या बातम्या येत होत्या. आम्ही १० वर्षांत देशाला या गर्तेतून बाहेर काढले, असेही मोदी म्हणाले. जनतेने काँग्रेसला फक्त विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश दिला. काँग्रेसच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जिथे पक्ष सलग तीन वेळा १०० चा आकडा पार करू शकला नाही, असेही मोदी म्हणाले.

लोकसभा अध्यक्ष संतापले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू होताच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. लोकसभा अध्यक्षांनी वारंवार सूचना देऊनही विरोधी सदस्यांनी गदारोळ सुरूच ठेवला. त्यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संतापले. तुम्ही कसले विरोधी पक्षनेते आहात. तुम्हाला प्रतिष्ठा घालवायची आहे का, असा सवाल त्यांनी राहुल गांधींना केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR