नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीतील भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची रविवारी बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ स्ािंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने बोलावलेली प्रमुख पदाधिका-यांची ही मोठी बैठक असल्याचे म्हटले जाते.
या बैठकीत राज्य सरकारद्वारे राबवण्यात येत असलेल्या योजनांवर चर्चा झाली. तसेच, पंतप्रधान मोदींनी जनतेची सेवा कशी करावी आणि राज्यांना सर्वांगीण विकासाकडे कसे घेऊन जायचे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. दरम्यान, या बैठकीत प्रशासनाशी संबंधित विषयांवर चर्चा झाल्याचे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. गेल्यावेळी फेब्रुवारीमध्ये अशीच बैठक झाली होती.
भाजपच्या सुशासन कक्षाचे प्रभारी आणि माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी सांगितले की, या बैठकीत भाजपचे १३ मुख्यमंत्री आणि १५ उपमुख्यमंत्री सहभागी झाले होते. या बैठकीत शासकीय कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी आणि जमिनीवरील सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यावर भर देण्यात आला. भारताच्या विकासाचे ध्येय साध्य करण्याला गती देण्यावर पंतप्रधानांनी भर दिला. तसेच, नवीन शैक्षणिक धोरण आणि पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था निर्माण करण्यात राज्यांच्या भूमिकेवर बैठकीत चर्चा झाली.