नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील करदात्यांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी ३१ जुलैअखेर विक्रमी ७ कोटी २८ लाख विवरणपत्रे दाखल केली असून, त्यापैकी ५ कोटी २७ लाख विवरणपत्रे नव्या करप्रणालीअंतर्गत दाखल झाली आहेत. गेल्या वर्षी या कालावधीत ६ कोटी ७७ लाख विवरणपत्रे दाखल झाली होती, अशी माहिती आज प्राप्तिकर विभागाने दिली.
कर विभागाने सलग तिस-या वर्षी ३१ जुलैनंतर विवरणपत्रे दाखल करण्यासाठी मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेतला आहे. अंतिम मुदतीनंतर दाखल केलेल्या करविवरणपत्रासाठी ५ हजार रुपयांपर्यंत विलंब शुल्क भरावे लागणार आहे. ५ लाख रुपयांपर्यंत करपात्र उत्पन्न असलेल्यांसाठी ते १ हजार रुपये असेल, असेही प्राप्तीकर विभागाने स्पष्ट केले. यावेळी प्रथमच विवरणपत्रे दाखल करणा-यांची संख्या ५८ लाख ५७ हजार आहे.
अंतिम मुदतीच्या दिवशी ३१ जुलै रोजी एका दिवसात सुमारे सत्तर लाख विवरणपत्रे दाखल झाली. १७ जुलै रोजी प्रति सेकंद ९१७ विवरणपत्रे दाखल झाली, तर ३१ जुलै रोजी प्रति मिनिट ९३६७ विवरणपत्रे दाखल झाली. हा आतापर्यंतचा सर्वोच्च दर आहे.
ठळक वैशिष्ट्ये ….
– प्रथमच विवरणपत्रे दाखल करणा-यांची संख्या ५८ लाख ५७ हजार
– ३१ जुलै रोजी सुमारे सत्तर लाख विवरणपत्रे दाखल
– पोर्टलवर १७ जुलै रोजी प्रतिसेकंद ९१७ विवरणपत्रे दाखल
– ३१ जुलै रोजी प्रतिमिनीट ९३६७ विवरणपत्रे दाखल
– ३१ जुलै रोजी तीन कोटी २१ लाख लॉग-इन यशस्वी