मुंबई : प्रतिनिधी
देशातील नामांकित उद्योगपती, रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते विजयपत सिंघानिया यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे पुत्र आणि रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानिया यांनी दिली. उद्योग, विमानचालन आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान देणा-या या दिग्गज व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने अनेकांनी दु:ख व्यक्त केले.
विजयपत सिंघानिया हे केवळ उद्योगपती नव्हते, तर ते एक कुशल एव्हिएटर म्हणूनही ओळखले जायचे. हॉट एअर बलूनद्वारे सर्वाधिक उंची गाठण्याचा जागतिक विक्रम त्यांच्या नावावर आहे. रेमंड या वस्त्र ब्रँडला देश-विदेशात ओळख मिळवून देण्यात विजयपत सिंघानिया यांचा मोठा वाटा आहे. १९५८ मध्ये मुंबईत पहिले रेमंड शोरूम सुरू करण्यात आले. १९६० मध्ये परदेशातून आधुनिक मशिनरी आयात करून त्यांनी उत्पादनाला नवी दिशा दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली रेमंडने जागतिक स्तरावर झेप घेतली.
१९८० मध्ये कंपनीची सूत्रे विजयपत सिंघानिया यांच्या हाती आल्यानंतर त्यांनी व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला. १९८६ मध्ये ‘पार्क अव्हेन्यू’ हा परफ्यूम ब्रँड लाँच करत त्यांनी फॅब्रिकच्या पलीकडे जाऊन विविध क्षेत्रांत प्रवेश केला. १९९० मध्ये परदेशात पहिले शोरूम सुरू करून त्यांनी रेमंडचा विस्तार जागतिक पातळीवर नेला.
















