मुंबई : वृत्तसंस्था
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाचा साखरपुडा झाल्याची चर्चा सुरू असतानाच अभिनेत्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. विजयच्या कारचा भीषण अपघात झाला असून त्यावेळी अभिनेता गाडीतच होता.
दरम्यान, अपघातग्रस्त कारचा व्हीडीओही समोर आला आहे. ज्यात गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाल्याचे दिसत आहे. यामुळे चाहत्यांनी आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. अशातच अपघातानंतर अभिनेता विजय देवरकोंडाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
अभिनेता विजय देवरकोंडाने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया एक्स हॅण्डलवर यासंदर्भात माहिती शेअर केली आहे. ज्यात त्याने लिहिले आहे की, सर्व काही ठीक आहे. माझ्या गाडीची टक्कर झाली. पण आम्ही सगळे ठीक आहोत. मी स्ट्रेंथ वर्कआऊट केले आहे आणि आत्ताच घरी पोहोचलो आहे. माझ्या डोक्याला थोडीशी दुखापत झाली आहे. ज्यामुळे काही प्रमाणात वेदना होत आहेत. तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम आणि आपुलकी. या बातमीमुळे तुम्ही ताण घेऊ नका.
माहितीनुसार, अभिनेता विजय देवरकोंडा आपल्या कुटुंबासोबत पुट्टपर्तीमधील प्रशांती निलयम आश्रमात श्री सत्य साईबाबांच्या महासमाधीचे दर्शन घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी हैदराबादला परतत असताना हैदराबाद-बंगळुरू महामार्गावर हा अपघात झाला. रिपोर्टनुसार, विजय देवेराकोंडाच्या लेक्सस एलएम ३५० या गाडीला मागून दुस-या कारने जोरदार टक्कर दिली आणि हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. अपघातानंतर एका मित्राच्या कारने विजय हैदराबादला परतल्याचे समजत आहे.