पूर्णा : शहरातील पूर्णा- झिरोफाटा रस्त्यावर ११ केव्ही विद्युत वाहिनीच्या तारांवर काम करत असताना विजेच्या धक्याने आऊटसोर्सिंग कर्मचारी विशाल सुदामराव जोगदंड (वय २६) रा.गौर ता.पूर्णा यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवार, दि.१९ रोजी घडली. यावेळी सोबत असलेल्या सहका-यांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला. घटनास्थळी महावितरणचे कोणीही वरीष्ठ अधिकारी न आल्याने रास्ता रोकोचा प्रयत्न करण्यात आला.
महावितरण कंपनीच्या पूर्णा उपविभाग अंतर्गत मागील काही दिवसांपासून हेल्पर पदावर जोगदंड कार्यरत होते. रविवारी ते ड्युटीवर आले असता झिरोफाटा-पूर्णा रोडवर वैभव जिंनीग फॅक्टरी जवळ विद्युत वाहिनीतील बिघाड ते स्थानिक महावितरण कंपनीचे सहकारी लाईनमेन सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी गेले होते. यावेळी विजेचा जोरदार धक्का लागल्याने जोगदंड यांचा मृत्यू झाला.
दरम्यान जोगदंड यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते. संतप्त जमावाकडून रास्तारोको करण्याचा प्रयत्न केला. परंतु पूर्णा उपविभागाचे पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे फौजदार पडलवार, पो.कॉ. माळकर, पो.कॉ. टाकरस आदीं कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला शांत करण्यासाठी प्रयत्न केला.