23.5 C
Latur
Wednesday, May 21, 2025
Homeसंपादकीयविज्ञानदीप मालवला

विज्ञानदीप मालवला

जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे वृद्धापकाळाने पुण्यातील निवासस्थानी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने वैज्ञानिक आणि साहित्यिक जगतात मोठी पोकळी निर्माण झाली असून खगोलशास्त्रातील तेजस्वी तारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे. खगोलशास्त्रातील त्यांचे महत्त्वपूर्ण संशोधन आणि विज्ञानाचा सामान्यांपर्यंत प्रसार करण्याचे कार्य कायम स्मरणात राहील. डॉ. नारळीकर हे ‘हॉईल-नारळीकर सिद्धांत’ मांडणारे एक थोर भौतिकशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जात. ते ब्रह्मांडाच्या स्थिर स्थितीच्या सिद्धांताचे अभ्यासक होते. कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी एका सुशिक्षित कुटुंबात जन्मलेल्या डॉ. नारळीकर यांचे शालेय शिक्षण बनारस येथे झाले. त्यांचे वडील प्रा. विष्णू वासुदेव नारळीकर हे बनारस हिंदू विद्यापीठात गणिताचे विभागप्रमुख होते, तर आई संस्कृत पदवीधर होत्या. लहानपणापासूनच त्यांना गणित आणि विज्ञानाची आवड होती.

१९५९ मध्ये त्यांनी गणित आणि खगोलीय पदार्थविज्ञान विषयात बी.एस्सी पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. तेथे केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी एम.एस्सी पदवी मिळवली. या विद्यापीठात त्यांनी जगप्रसिद्ध प्राध्यापक फ्र्रेड्रिक हॉईल यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी केली. वयाच्या २२ व्या वर्षी ते रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सदस्य बनले. तसेच किंग्ज कॉलेज, केंब्रिजचे फेलो म्हणूनही त्यांची निवड झाली. १९६६ मध्ये त्यांचा विवाह गणितज्ञ मंगला राजवाडे यांच्याशी झाला. मंगला नारळीकर या त्यांच्या वैज्ञानिक आणि साहित्यिक कार्यात सहकारी होत्या. मंगला नारळीकर यांचे २०२३ मध्ये निधन झाले. १९७२ मध्ये जयंत नारळीकर यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत (टीआयएफआर) प्राध्यापक म्हणून कार्य केले.

१९८८ मध्ये त्यांनी पुण्यात आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोल-भौतिकी केंद्र आयुका (आययूसीएए) स्थापन केले. ते २००३ पर्यंत या संस्थेचे संचालक होते. १९९४ ते ९७ दरम्यान ते आंतरराष्ट्रीय खगोलीय संघाच्या कॉस्मॉलॉजी कमिशनचे अध्यक्ष होते. २०२१ मध्ये नाशिक येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. डॉ. नारळीकर यांनी आपल्या संशोधनातून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या पीएच.डी प्रबंधात गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आणि सृष्टीच्या निर्मितीसारख्या विषयांचा समावेश होता. त्यांनी विश्वाच्या स्थिर स्थितीचा सिद्धांत मांडून खगोलशास्त्राला एक वेगळी दृष्टी दिली. हॉईल यांच्या समवेत त्यांनी गुरुत्वाकर्षणसदृश सिद्धांत सादर केला, ज्यामुळे विशोत्पत्ति शास्त्रात महत्त्वाचे योगदान दिले. डॉ. नारळीकर यांनी विज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मराठी, हिंदी व इंग्रजीमध्ये विपुल लेखन केले. त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकांमध्ये ‘अभयारण्य’, ‘वामन परत ना आला’, ‘अंतराळ’, ‘भस्मासुर’, ‘व्हायरस’, ‘चला जाऊ अवकाश सफरीला’ यांचा समावेश होता. ‘चार नगरात माझे विश्व’ आणि ‘पाहिलेले देश, भेटलेली माणसे’ ही त्यांची आत्मचरित्रे आहेत.

‘चार नगरात माझे विश्व’ या त्यांच्या आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तर ‘यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला. अमेरिकेतील एका संस्थेने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले होते. जनसामान्यांना विज्ञानातील गूढ रहस्ये कळावीत म्हणून डॉ. नारळीकर यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतून विज्ञान साहित्याची निर्मिती केली. त्यांनी लिहिलेल्या मराठी विज्ञान कथांमुळे लहान मुलांमध्ये विज्ञानाची रुची निर्माण झाली. ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ हॉईल-नारळीकर थिअरी प्रसिद्ध झाली होती. विश्वाची निर्मिती महास्फोटातून झाली की, ते स्थिर स्थितीत आहे. असे दोन मतप्रवाह खगोल व भौतिक तज्ज्ञांमध्ये होते. हॉईल-नारळीकर यांचा सिद्धांत स्थिर स्थिती विश्वाची कास धरणारा होता. डॉ. नारळीकर यांनी वयाच्या २६ व्या वर्षी गुरुत्वाकर्षणासंबंधीचा सिद्धांत मांडला आणि ते स्वतंत्र भारतातील विज्ञान जगताचा चेहरा ठरले. या सिद्धांतातूनच पुढे विश्वनिर्मितीच्या रहस्यावरील संशोधनाला चालना मिळाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवल्यानंतर भारतातील खगोलशास्त्रातील संशोधन आणि लोकप्रियता अधिक उंचावण्यासाठी ते भारतात परतले.

डॉ. नारळीकरांच्या अचाट बुद्धिमत्तेची कल्पना असल्याने १९७२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना बोलावून घेतले आणि डॉ. नारळीकर टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये दाखल झाले. पुण्यात ‘आंतरविश्व विद्यापीठ’ स्थापन करून राज्यात विज्ञान संशोधनाची भक्कम पायाभरणी त्यांनी केली. डॉ. नारळीकरांनी विज्ञानकथा इतक्या रसाळ भाषेत, सोप्या आणि सुलभरीत्या मांडल्या की, वाचकांना त्याची चटक लागली. विज्ञानाचे महत्त्व आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजावा असाच त्यांचा लेखनामागचा उद्देश होता. त्यांची लेखणी कायम महाराष्ट्राला विज्ञानसाक्षर करण्यासाठी झिजत राहिली. पाश्चात्त्य देशांतील लोकांमध्ये जसा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, तसा आपल्याकडील लोकांचा असावा, ही त्यांची प्रांजळ भावना होती. फलज्योतिषाला आव्हान देणारी त्यांची भूमिका होती, ते समाजाला सतत विचार करायला लावणारे व्यक्तिमत्त्व राहिले. युवकांना संशोधनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ते कायम कार्यरत असत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाला डॉ. नारळीकर यांनी कायम सक्रिय पाठबळ दिले होते.

अंनिस, आयुका आणि पुणे विद्यापीठाचा संख्याशास्त्र विभाग यांच्या वतीने फलज्योतिषाची एक शास्त्रीय चाचणी डॉ. नारळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी केली होती. ‘हॉईल-नारळीकर सिद्धांता’ने ब्रह्मांडाच्या उत्पत्तीबाबतच्या पारंपरिक संकल्पनांना आव्हान दिले. त्यांचा जीवनप्रवास केवळ प्रयोगशाळेतच नव्हे तर सामान्य जनतेपर्यंत विज्ञान पोहोचवण्याचाही होता. मराठीतून विज्ञानलेखन करून त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला विज्ञानाकडे बघण्याची नवी दृष्टी दिली. विविध पुस्तकांमधून त्यांनी विज्ञानसाक्षरतेचा संदेश घरोघरी पोहोचवला. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. ‘पद्मविभूषण’सह अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या डॉ. नारळीकर यांच्या जाण्याने विज्ञान आणि साहित्य क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. भारताच्या या महान वैज्ञानिकास भावपूर्ण श्रद्धांजली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR