अमरावती : प्रतिनिधी
मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा केल्यावर वेळ साधत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. विठ्ठला सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे, असे म्हणत त्यांनी शेतक-यांच्या कर्जमाफीकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.
दरम्यान, आषाढी एकादशीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवार, ६ जुलै रोजी पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पांडुरंगाची सपत्निक शासकीय पूजा केली. या पूजेनंतर त्यांनी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना केल्याचे सांगितले.
शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांच्या प्रश्नांवर मागील महिन्यात बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केले होते. सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी आंदोलन स्थगित केले. मात्र, ते त्यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर अद्याप ठाम आहेत. अशातच आज आषाढी एकादशीचे औचित्य साधत त्यांनी राज्य सरकारला कर्जमाफीच्या मुद्याची आठवण करून दिली आहे.
बच्चू कडू यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले की, विठ्ठला, मागील ३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतक-यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलंय. दिवसरात्र शेतात राबून बळिराजा सा-या जगाचं पोट भरण्यासाठी आपला घाम गाळतो, कष्ट करून जीवाचं रान करतो. पण जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी राजावरच उपाशीपोटी झोपायची वेळ सध्या आली आहे.
विठ्ठला, आमची शेतक-याची जात हाय. स्वत:च्या कष्टाचंच आम्ही खातो. फुकट काही मिळायची आमची अपेक्षा पण नसते आणि तसलं आम्हाला पचनी देखील पडत नाही. पण काबाडकष्ट करून, मातीत पैसा ओतून जो शेतमाल आम्ही पिकवतो त्याला जर किमान बाजारभाव भेटला नाही अन् नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमालाचे नुकसान झाले तर मात्र आम्ही कुणाकडे मदतीची याचना करायची? कुणाकडे पदर पसरायचा?
विठ्ठला! तुझ्या दारात भक्ताला जात, पात, धर्म, रंग नसतो तसाच शेतक-याच्या कपाळावरही फक्त शेतकरीच लिहिलेलं असतं. तेव्हा पांडुरंगा, राजकारण बाजूला ठेवून सरकारला कर्जमाफीचा निर्णय देण्याची सद्बुद्धी दे अशी तुझ्याकडे प्रार्थना, अशा शब्दांत त्यांनी कर्जमाफीवरून सरकावर निशाणा साधला आहे.