नागपूर : प्रतिनिधी
देशात सध्या चार दिशांना चार वेगळ्या पद्धतीचे हवामान असताना आता या सातत्याने होणा-या बदलांचे परिणाम महाराष्ट्रावरही होताना दिसत आहेत. देशभरातील बहुतांश राज्यांमध्ये सध्या उष्मा वाढला असून, पूर्वोत्तर राज्यांमध्ये मात्र पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. दक्षिण भारतातील किनारपट्टी क्षेत्रामध्ये दमट हवामानात वाढ होत असून, मध्य भारत आणि महाराष्ट्रामध्येसुद्धा एकीकडे उष्मा वाढत असतानाच दुसरीकडे मात्र पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात उच्चांकी तापमानाचा आकडा तुलनेने कमी असला तरीही मुंबई शहर मात्र इथे अपवाद ठरताना दिसत आहे. शहराच्या बहुतांश भागांसह उपनगरीय क्षेत्रांमध्येसुद्धा सूर्याचा कहर सुरूच आहे. तर होरपळणा-या विदर्भाला मात्र या स्थितीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासांमध्ये विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. विदर्भच नव्हे तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आल्यामुळे ऐन उन्हाळ्यातील या पावसाळी वातावरणाने नागरिकांच्या चिंतेत भर टाकली आहे.
सध्याच्या घडीला गुजरातच्या उत्तरेपासून खंडीत होणा-या वा-यांमुळे कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. तर, मध्य महाराष्ट्र आणि नजीकच्या भागांवरही चक्राकार वारे वाहत आहेत. ज्यामुळे महाराष्ट्रात वातावरणात लक्षणीय बदल पाहायला मिळत आहेत.
महाराष्ट्रात पावसासाठी पूरक वातावरण होत असतानाच केंद्रीय हवामानशास्त्र विभागाने पूर्व मध्य भारत, उत्तर पूर्व भारत आणि अरुणाचल प्रदेशात २३ मार्च रोजी ढगांच्या गडगडाटासह आणि वादळी वा-यांसह पावसाचा अंदाज वर्तवत २० ते २३ मार्चदरम्यान या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये उत्तर पश्चिम भारतामध्ये कमाल तापमान ३ ते ५ अंशांनी वाढणार असल्याचा इशारा आयएमडीने जारी केला आहे. याव्यतिरिक्त देशातील हवामानात कोणतेही लक्षणीय बदल होणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.