जळकोट : ओमकार सोनटक्के
सर्व शिक्षा अभियानांतर्गत पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार असून जळकोट तालुक्यामध्ये १६ जून पासून शाळांचे कुलूप उघडणार आहे. शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी वर्ग खोल्याची स्वच्छता करण्यात येणार असून शासनाकडे तालुक्यातील ८७२१ विद्यार्थ्यांसाठी पुस्तक के उपलब्ध करावी अशी मागणी करण्यात आली आहे. ही पुस्तके उपलब्ध झाल्यानंतर ती संबंधित शाळांना वाटप करण्यात येणार आहेत यानंतर शाळा सुरू होण्याच्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांनी दिली आहे.
तालुक्यातील जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळेतील मुलांना पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. तालुक्यातील शाळांच्या मागणीनुसार तालुकास्तरावरून ही पुस्तके वाटप करण्यात आली आहेत. इयत्ता पहिली ते आठवी मध्ये शिकणारे बालक पुस्तकापासून वंचित राहू नये, पुस्तकाअभावी शिक्षणात अडचण येऊ नये, शाळेतील सर्व दाखल पात्र मुलांची शंभर टक्के
उपस्थिती टिकविण्यासाठी गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके योजना सुरू केली आहे. मोफत पाठ्यपुस्तके योजना २०२५-२६ मध्ये एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही. याची शाळास्तरावर दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हास्तरावरून आणखीन तालुकास्तरावर पुस्तके उपलब्ध झाली नाहीत. सुरुवातीला तालुक्याच्या ठिकाणी पुस्तके येणार असून या ठिकाणाहून वेगवेगळ्या शाळांना पुस्तकांचे वाटप संख्यानुसार करण्यात येणार आहे. आणखीन शाळा सुरू होण्यास वीस दिवस कालावधी आहे यामुळे येणा-या एक-दोन दिवसांमध्ये जळकोट या ठिकाणी पुस्तके उपलब्ध होतील व नंतर संख्या निहाय नियोजन करून या पुस्तकाचे वाटप करण्यात येणार आहे.