बुलडाणा : प्रतिनिधी
बुलडाणा जिल्ह्यात शिक्षणाचा बट्ट्याबोळ करण्याचा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी महिला शिक्षकांऐवजी मुलांना मजूर महिला शिक्षणाचे धडे देत आहेत. २०० रुपये रोजंदारीने या महिला मजूर विद्यार्थ्यांना शिकवतात. शेलूद येथील जिल्हा परिषद शाळेतील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बालसंगोपनाच्या नावाखाली दोन शिक्षिका वर्षभरापासून दीर्घ रजेवर आहेत. शिक्षणमंत्री आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाण्यातील चिखली तालुक्यातील शेलूद येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या शाळेतील २ महिला शिक्षकांनी चक्क २०० रुपये रोजंदारीवर महिलांना शाळेतील मुलांना शिकवण्यासाठी ठेवले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दोन शिक्षिका बालसंगोपनाची रजा घेऊन स्वत:च्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी लातूरला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे .
बालसंगोपनासाठी मिळत असलेल्या रजेचा गैरफायदा होत असल्याचा प्रकार बुलडाण्यात समोर आला आहे. मात्र यामुळे इकडे गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून विद्यार्थी वा-यावर आहेत. अर्चना बाहेकर आणि शीला बाहेकर असे त्या महिला शिक्षकांची नावे असून या दोघींनी २०० रुपये रोजंदारीवर विद्यार्थ्यांना आपल्या जागी शिकवायला दोन महिलांना ठेवले आहे. या संपूर्ण प्रकारापासून शिक्षण विभाग हा अनभिज्ञ कसा? असा सवाल पालक वर्ग विचारत आहे.