जळकोट : प्रतिनिधी
गत दोन वर्षांपूर्वी ज्या शेतक-यांनी आपल्या शेतामधील बागायती शेतीसाठी महावितरणकडे डिमांड भरले होते त्याचे कनेक्शन अद्यापही मिळाले नाहीत अशी शेतकरी मात्र चातकासारखी वीज कनेक्शन कधी मिळेल याची वाट पाहत आहेत . गेल्या दीड वर्षापासून युती सरकारने शेतक-यांच्या शेतीसाठी वीज कनेक्शन घेणे बंद केले आहे त्यामुळे राज्यभरातील हजारो शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अनेक शेतकरी महावितरण कार्यालयाच्या चकरा मारत आहेत .
यावर्षी चांगला पाऊस पडला आहे तसेच सरकार मागेल त्याला विहीर उपलब्ध करून देत आहे. यासोबतच साठवण तलाव पाझर तलाव पूर्णपणे भरलेले आहेत. याबरोबरच जळकोट तालुक्यात नवीन सात उच्च पातळी बंधारे झालेले आहेत. यासोबतच तालुक्यात पंधरा साठवण तलाव आहेत. अनेक शेतक-यांनी विहिरी घेतलेल्या आहेत. यामुळे शेतक-यांनी आपणास शेती भिजविण्यासाठी महावितरणकडून वीज कनेक्शन मिळावे यासाठी दोन वर्षांपूर्वी अर्ज केले आहेत
मात्र सरकारच्या दुर्लक्षामुळे उदगीर-जळकोट विधानसभा मतदारसंघातील यासोबतच उदगीर विभागांतर्गत येणा-या अनेक गावांमधील शेतकरी वीज कनेक्शनपासून वंचित आहेत. शेतकरी हे अनेक वेळा महावितरणच्या चकरा मारत आहेत परंतु सध्या सरकारने सौर ऊर्जेचे धोरण अवलंबिले आहे. ज्या शेतक-यांनी वीज कनेक्शनसाठी डिमांड भरले आहे, अशा शेतक-यांनी आता सौर पंप घ्यावे अशी सक्ती करण्यात आली आहे. एक तर सौर पंप घ्या किंवा आपले पैसे परत घेऊन जा असा मेसेज अनेक शेतक-याला येत आहे .