37.2 C
Latur
Tuesday, May 6, 2025
Homeमहाराष्ट्रविधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचे गुन्हेगारासोबत बर्थडे सेलिब्रेशन

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचे गुन्हेगारासोबत बर्थडे सेलिब्रेशन

पुणे : प्रतिनिधी
गुंड आकाश ऊर्फ आक्या बॉण्ड ऊर्फ सुमित मोहोळ अण्णा बनसोडेंना केक भरवतानाचा आणि सोबत बनसोडे पुत्र सिद्धार्थ असल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय धनंजय मुंडेंना गुंडाशी जवळीक राखणे चांगलेच भोवले. त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली. त्यानंतर अजित पवारांनी पक्षातील सर्व नेत्यांना तंबी देत फोटो, व्हीडीओ काढताना काळजी घ्या असे म्हटलं होतं.

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेही अशाच एका गुन्हेगारामुळे चर्चेत आले आहेत. निमित्त बनसोडेंच्या वाढदिवसाचे होते. गुंड आकाश ऊर्फ आक्या बॉण्ड ऊर्फ सुमित मोहोळ थेट बनसोडेंना केक भरवतानाचा आणि सोबत बनसोडे पुत्र सिद्धार्थ असल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अल्पवयीन असल्यापासून गुन्हेगारी क्षेत्रात उतरलेल्या आक्या बॉण्डला बनसोडेंनी स्वत:च्या बर्थडेनिमित्त केक भरवला. हे पाहून बनसोडे गुन्हेगारांचे उदात्तीकरण तर करत नाहीत ना? अशी चर्चा सध्या परिसरात रंगली आहे.

सोशल मीडियावर पोस्ट
पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांना नेहमीच डावलत आले. बनसोडेंनी मात्र अजित दादा मला मंत्री करणार असा अट्टाहास लावून धरला. सरतेशेवटी अजित दादांनी बनसोडेंची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी वर्णी लावली. पण या पदाची जबाबदारी सोपवताना अजित दादांनी बनसोडेंना उपाध्यक्षपदाची गरिमा राखण्याचा सल्ला नक्कीच दिला असणार.

आक्या बॉण्डवर १६ गुन्हे दाखल
बनसोडे पुत्र सिध्दार्थच्या पेजवर सुद्धा ही रील होती, नंतर मात्र ही रील डिलीट करण्यात आल्याचं ही बोलले जात आहे. आक्या बॉण्डने अल्पवयीन असल्यापासून गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल टाकलं आहे, आजवर त्याच्यावर १६ गुन्हे दाखल आहेत.

बनसोडे आधीही आलेले अडचणीत
बनसोडे पुत्र सिद्धार्थमुळे याआधी ते अडचणीत आले आहेत. एका ठेकेदाराच्या मॅनेजरला मारहाण प्रकरणी सिद्धार्थने जेलची हवा खाल्ली होती. त्यावेळी अजित दादांनी बनसोडेंना शेलक्या शब्दांत सुनावले सुद्धा होते. त्यानंतर आता आक्या बॉण्डमुळेही बनसोडे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

अण्णा बनसोडेंची प्रतिक्रिया
हे फोटो आणि व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर ते म्हणाले, मी आक्या बॉण्डला कधी भेटलो नाही, त्यामुळे त्याला मी ओळखत असण्याचा संबंध येत नाही. माझ्या बर्थडे वेळी मी पहिल्यांदा त्याला पाहिले. हजारो समर्थक शुभेच्छा द्यायला आले होते, त्यात तो एक होता. मी गुन्हेगारांचं उदात्तीकरण कधी करणार नाही, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR