26.7 C
Latur
Saturday, July 19, 2025
Homeमहाराष्ट्रविधानसभा १४ कोटी जनतेच्या मालकीची

विधानसभा १४ कोटी जनतेच्या मालकीची

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदारांचे कान टोचले
विधानभवनातील सुरक्षा कडक करण्याची विनंती

मुंबई : प्रतिनिधी
विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सर्व सदस्यांची कानउघाडणी केली. ही विधानसभा आमदारांची, मंत्र्यांची, मुख्यमंत्र्यांची किंवा इथल्या कर्मचा-यांच्या मालकीची नाही तर ही विधानसभा राज्यातील १४ कोटी जनतेच्या मालकीची आहे. विधानसभेत समाजाला दिशा देण्याचे काम झाले पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा आहे; पण या विधानसभेत विचारातून, चर्चेतून संदेश जाण्याऐवजी लाथा-बुक्क्यांचा संदेश जात असेल तर आपण चिंतन करण्याची आवश्यकता आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आमदारांना कानपिचक्या दिल्या.

देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत विरोधी पक्षाच्या वतीने मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच फडणवीस यांनी गुरुवारी विधानभवनात घडलेल्या मारहाणीच्या घटनेवर खेद व्यक्त केला. तसेच माध्यमांच्या समोर घोषणा आणि विधानसभा अध्यक्षांवर होणारे आरोप याबद्दल फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या सभागृहात २८८ सदस्य आहेत. नियमाने ४५ लक्षवेधी सूचना झाल्या पाहिजेत. आपण ४५ ऐवजी २०० लक्षवेधी करता आणि २०० लक्षवेधी घेतल्या तरीही २८८ सदस्यांच्या लक्षवेधी लागू शकत नाही. त्यामुळे जी भाषा आपण वापरतो ती काही योग्य नाही. संसदीय परंपरांचे पालन, संसदीय भाषेचे पालन आणि सातत्यपूर्ण संवाद ही त्रिसूत्री जरी आपण पाळली तरी आपण चांगला संदेश देऊ शकू, असे फडणवीस म्हणाले.

अभ्यागत आता बिना
बिल्ल्याचा दिसणार नाही
सुरक्षा व्यवस्थेत बदल करून आता कोणताही अभ्यागत येऊ द्या, तो बिना बिल्ल्याचा दिसणार नाही. इथे येणा-या अभ्यागतांच्या गळ्यात ओळखपत्र असले पाहिजे आणि ते जर नसेल तर अशांना सुरक्षा रक्षकांनी बाहेर काढले पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबईला महाराष्ट्रापासून
कुणी तोडू शकत नाही
मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे षड्यंत्र, असे भाषण ४ महिन्यांनंतर सुरू होईल. त्यामुळे मी आताच सांगतो मुंबईला महाराष्ट्रापासून कुणी तोडू शकत नाही. कुणाचा बाप, बापाचा बाप, त्याचा बाप, आज्जा आला तरीही हजारो पिढ्या मुंबई ही महाराष्ट्राची राहील. महाराष्ट्रात मराठी माणसाचाच आवाज बुलंद राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR