विधान परिषदेच्या सभापतीपदीसाठी आज उमेदवारी अर्ज भरणार
उद्या निवडणूक
नागपूर : प्रतिनिधी
गेली अडीच वर्षे रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी अखेर निवडणूक जाहीर झाली आहे. गुरुवारी ही निवडणूक होणार असून, उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे. उपसभापती निलम गो-हे यांनी आज विधानपरिषदेच्या सभागृहात या निवडणुकीची घोषणा केली. त्यामुळे नियमानुसार राज्यपालांनी सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी १९ डिसेंबर २०२४ हा दिवस निश्चित केला आहे.
दरम्यान, महायुतीकडून विधानपरिषद आमदार राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने तशी घोषणा केली. उद्या बुधवारी सकाळी १० वाजता अर्ज दाखल केला जाणार आहे. त्यानंतर अर्जाची छाननी करण्यात येणार असून गुरुवारी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. पक्षाने आपली उमेदवारी घोषित केल्याने आमदार राम शिंदे यांनी पक्षश्रेष्ठींसोबतच प्रदेश नेतृत्वाचेही आभार मानले आहेत.
अधिवेशनाच्या दुस-या दिवशी विधान परिषदेचे कामकाज सुरु होताच उपसभापती निलम गो-हे यांनी राज्यपाल पी. सी. राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार सभापतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची ७ जुलै २०२२ रोजी सदस्यत्वाची मुदत संपुष्टात आल्यापासून सभापतिपद रिक्त आहे. त्यामुळे राज्यपालांनी महाराष्ट्र विधान परिषद नियमातील नियम ६ मधील तरतुदीला अनुसरून सभापतींच्या निवडणुकीसाठी १९ डिसेंबर दिवस निश्चित केला असल्याचे सांगितले. या पदासाठी १८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे अर्ज करता येणार आहे. त्यानंतर अवघ्या ५ मिनिटांनी आलेल्या अर्जाची छाननी करून अंतिम उमेदवार निश्चित केले जातील, असेही उपसभापती गो-हे यांनी सांगितले.
नियम तपासून निर्णय देणार
सभापतीपदाची निवडणूक घोषित करताच शिवसेना ठाकरे गटाचे सदस्य ऍड. अनिल परब यांनी याला आक्षेप घेतला. ज्यांच्याविरुद्ध अपात्रतेची याचिका प्रलंबित आहे आणि त्याचा अजनूही निकाल लागलेला नाही, असा संबंधित उमेदवार सभापतीपदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरू शकतो काय, अशी विचारणा केली. तर सभापतीपदाची मुदत २०२२ मध्ये संपली. त्यानंतर ही निवडणूक किती कालावधीत घेणे बंधनकारक आहे. ही जागा रिक्त ठेवणे हे कायदेशीर आहे काय, अशी विचारणा आ. शशिकांत शिंदे यांनी केली. यासंदर्भात अभ्यास करूनच निर्णय घेतलेला आहे, असे सांगण्यात आले.