21.4 C
Latur
Friday, September 27, 2024
Homeमहाराष्ट्रविधान परिषदेच्या ११ जागासाठी १२ जुलै रोजी होणार निवडणूक

विधान परिषदेच्या ११ जागासाठी १२ जुलै रोजी होणार निवडणूक

– गुप्त मतदानामुळे सर्वच पक्षांना फाटाफुटीचा धोका

मुंबई : प्रतिनिधी
विधानसभेतील आमदारांच्या मतदानाने विधान परिषदेत पाठवण्यात येणा-या ११ जागांची द्वैवार्षिक निवडणूक १२ जुलै रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाने आज या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. ही निवडणूक गुप्त मतदानाने होते व मतांची फाटाफूट होण्याचा धोका सर्वच पक्षांना आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच राजकीय पक्षात सुरू असलेली चुळबुळ, काही आमदारांना लागलेले घरवापसीचे वेध लक्षात घेता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर होणारी ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. २ वर्षांपूर्वी अशाच एका निवडणुकीनंतर शिवसेनेत फूट पडून महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला होता.

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत; परंतु तत्पूर्वी विधान परिषदेच्या ११ जागांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक होणार आहे. भाई गिरकर, रामराव पाटील, रमेश पाटील (भाजपा), वजहत मिर्झा, प्रज्ञा सातव (काँग्रेस), निलय नाईक, बाबाजानी दुर्रानी (राष्ट्रवादी, अजित पवार गट), मनीषा कायंदे (शिवसेना, शिंदे गट), अनिल परब (शिवसेना, ठाकरे गट), महादेव जानकर (रासप), जयंत पाटील (शेकाप) या ११ सदस्यांची मुदत संपत असून त्यांच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने आज या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. २५ जूनला या निवडणुकीची अधिसूचना जारी होईल. २ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असेल. ३ जुलै रोजी छानणी झाल्यानंतर ५ जुलैपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे. १२ जुलैला मतदान झाल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होईल.

आमदार सांभाळण्याचे आव्हान
विधानसभेतील १४ जागा सध्या रिक्त आहेत त्यामुळे विधान परिषदेच्या ११ जागांच्या निवडणुकीतील विजयासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा २२.८४ एवढा आहे म्हणजेच २३ आमदारांचे पाठबळ लागणार आहे. विधानसभेतील सध्याचे संख्याबळ बघता भाजपाच्या ४, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या व अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रत्येकी २, आघाडीकडून काँग्रेसच्या २ व ठाकरे आणि शरद पवार गटाची मिळून १ अशा जागा निवडून येऊ शकतात. मात्र ही निवडणूक गुप्त मतदानाने होते व सर्वच पक्षांच्या आमदारांमध्ये सध्या चुळबुळ आहे. त्यामुळे निवडणूक झाल्यास मतांची फाटाफूट व घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR