24.8 C
Latur
Monday, July 8, 2024
Homeमहाराष्ट्रविधान परिषदेसाठी मविआची रणनिती

विधान परिषदेसाठी मविआची रणनिती

तिन्ही जागा निवडून आणण्याची आखली योजना
मुंबई : प्रतिनिधी
महाविकास आघाडीची मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सेंटरमध्ये आज बैठक पार पडली. बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक आणि १२ जुलै रोजी होणा-या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनिती ठरविण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी मविआच्या नेत्यांमध्ये सखोल चर्चा झाल्याचे समजते. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती आखली आहे.

या बैठकीला प्रामुख्याने उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, जितेंद्र आव्हाड, संजय राऊत, विजय वडेट्टीवार, रोहित पवार, आदित्य ठाकरे हे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते. १२ जुलैला होणा-या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव व्हावी, यासाठी काही महत्त्वाच्या नेत्यांकडे जबाबदारी देण्यात आली. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती आखली आहे. आता विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच जागावाटप संदर्भात चर्चा सुरू केल्या जातील, असे सांगण्यात आले. विशेष म्हणजे या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली आहे.

महाविकास आघाडी म्हणून तीन पक्ष आणि इतर घटक पक्ष यांची जिल्हा जिल्हास्तरावर एकजूट निर्माण होऊन निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सभा, मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे. महाविकास आघाडी मिळून एकत्रित लढल्यास आपण लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही चांगले यश मिळवू शकतो, हा विश्वास तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. जागावाटपसंदर्भातील बैठकांनाही लवकरच सुरुवात केली जाईल, असे सांगण्यात आले.

तिन्ही पक्षांची औपचारिक बैठक
तिन्ही पक्षाची आज प्राथमिक औपचारिक बैठक झाली. विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. मविआ लवकरच संयुक्त मेळावा घेणार आणि जनतेचे आभार मांडणार आहोत. जाहीरनामा निवडणूक प्रचार या संदर्भात प्राथमिक चर्चा झाली, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

विधानसभेसाठी
लवकरच मेळावा
मुंबईमध्ये लवकरच राज्यभरातील तिन्ही पक्षातील प्रमुख पदाधिका-यांचा मेळावा घेतला जाणार आहे. एकप्रकारे भव्य सभा असेल, ज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचे यश महाविकास आघाडीला प्राप्त झाले, त्यासंदर्भात मतदारांना धन्यवाद दिले जातील आणि आभारही मानले जातील. त्याचवेळी विधानसभेचे रणशिंग फुंकले जाणार आहे. आगामी निवडणुकीत कोणत्या मुद्यांवर मतदारांसमोर जायचे… महाविकास आघाडीचा नेमका जाहीरनामा कसा असेल, कोणते मुद्दे प्रचारात महत्त्वाचे ठरतील, या सगळ््यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR