मुंबई : सध्या राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा, प्रशांत कोरटकरांना अटक, अबू आझमींचे निलंबन, औरंगजेबाची कबर, दिशा सालियन प्रकरण, नागपूर दंगल अशा अनेक मुद्यांवरून यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजले. असे असताना आता विधान भवनाबाहेरच तरुणाने झाडावर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले. मात्र, नंतर समजूत काढल्यानंतर अखेर तो झाडावरून खाली उतरला.
ईश्वर शिंदे असे या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने विधान भवनाबाहेरच असलेल्या झाडावर चढून आंदोलन केले. यामध्ये एका हातात झेंडा घेतल्याचे पहायला मिळाले. ईश्वर याने एक तासापेक्षा जास्त वेळ आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान धुळ्याचे आमदार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित तरुणाच्या मागणीकडे लक्ष दिले. त्यानंतर या मागण्यांबाबत आश्वासन दिले गेले. या आश्वासनानंतर ईश्वर शिंदे हे आंदोलन मागे घेत खाली उतरला. या प्रकारामुळे परिसरात एकच चर्चा सुरू झाली आहे.
आंदोलक ईश्वर शिंदे बीडमधील रहिवासी असल्याची माहिती दिली जात आहे. तरुणाला झाडावरून खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर त्याला समजूत काढून खाली उतरवण्यात आले. आंदोलकाच्या हाती सेंद्रीय मॉलच्या संकल्पनेचे बॅनर असल्याचे समोर आले आहे.