16.9 C
Latur
Thursday, November 21, 2024
Homeसंपादकीयविनाकारण वादविवाद!

विनाकारण वादविवाद!

सध्या राज्यात निवडणुकीचे वातावरण तापलेले असून, त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांचे जाहीरनामा, वचननामा, संकल्प पत्र, महाराष्ट्रनामा अशा विभिन्न नावांनी पक्षांच्या भूमिका प्रसिद्ध झाल्या आहेत. यातून एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक राजकीय पक्ष भावनिक राजकारण करत स्वत:ची पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात आहे. जातीचे, धर्माचे राजकारण करून लोकांना फसवायचे, त्यांची डोकी भडकवायची असे राजकारण सुरू आहे. जाहीरनाम्यातून वारेमाप आश्वासनांची खैरात केली जाते. आश्वासने पूर्ण करायची नसतात, निवडणूक जिंकण्यासाठी ती करायची असतात. निवडणूक झाल्यावर राजकारणी जाहीरनामे विसरतात तसेच लोकही विसरतात. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटली तरी ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ अशा घोषणा होताना दिसतात. सत्तापिपासू वृत्तीचे राजकारणी येनकेन प्रकारे सत्ता काबीज करण्यासाठी आतुर असतात. महागाईने जनता हैराण आहे, रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. ग्रामीण भागात आरोग्य सेवेचा अभाव आहे, गोरगरिबांना शिक्षण महाग झाले आहे,

तरुणांच्या हाताला काम नाही, शेतक-यांच्या आत्महत्या आजही कमी होताना दिसत नाहीत, अशा प्रकारचे कितीतरी प्रश्न आ वासून उभे आहेत परंतु राजकारण्यांचे त्याकडे लक्ष नाही. त्यांना आपला मान-सन्मान, इगो महत्त्वाचा वाटतो. जनताही जात-धर्माच्या भावनिक प्रश्नांवर एकत्र येताना दिसते पण महागाई, शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, पर्यावरण या मूलभूत प्रश्नांसाठी एकत्र येताना दिसत नाही ही गंभीर बाब आहे. असो. आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी नेतेमंडळी प्रत्येक मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्यावरून आता एका वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख यांच्या प्रचार दौ-यात त्यांच्या बॅगा तपासल्यावरून वादावादी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या तपासणी पथकातील अधिका-यांनी नियमित तपासणीचा भाग म्हणून या बॅगा तपासल्या आणि उद्धवजी खवळले. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा औसा येथील हेलिपॅडवर त्यांच्या सामानाची तपासणी झाल्यामुळे उद्धव ठाकरे भडकले. आतापर्यंत किती जणांची तपासणी केली असा सवाल त्यांनी निवडणूक कर्मचा-यांना केला. ‘ही पहिलीच तपासणी आहे’ असे उत्तर आल्यावर ते म्हणाले,

दरवेळी मीच पहिला गि-हाईक का? मोदी-शहा यांच्या बॅगांचीही तपासणी करा. ते आल्यानंतर त्यांच्या बॅगा तपासा आणि जातानाही तपासा असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे तपासणीबाबत सतत तक्रार करीत असताना निवडणूक आयोगाने भाजप नेते नितीन गडकरी यांच्या बॅगाही तपासल्या आणि त्याचा व्हीडीओ व्हायरल झाला. बॅगांची झाडाझडती घेण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तपासणी अधिका-यांचीच उलट चौकशी केली. त्यांचे नाव, नियुक्तीपत्र, त्यांच्या खिशातील पाकिटात किती पैसे आहेत याचीही विचारणा केली. उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी केल्याबद्दल विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर टीका केली होती. ओडिशात मोदी यांच्या बॅगची तपासणी केल्याबद्दल तेथील अधिका-यांना निलंबित करण्यात आले होते. उद्धव ठाकरे बॅगा तपासणीनंतर म्हणाले, माझा तुमच्यावर राग नाही परंतु हा जो एकतर्फी कारभार सुरू आहे, त्याला माझा विरोध आहे.

मला जो कायदा लागू होतो तो मोदींनाही लागू झाला पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे व माझ्या बॅगेचीही तपासणी झाली होती. बॅग तपासणीचा अधिका-यांना पूर्ण अधिकार आहे. मात्र, अशा पद्धतीने विरोधी पक्षांनी तक्रार करणे, आरोप करणे चुकीचे आहे. उद्धव ठाकरे यांनी बॅगा तपासणीचे चित्रीकरण केले होते, अधिका-यांना जाब विचारण्याची कृतीही असमर्थनीय होती. कारण त्यामुळे निवडणूक कामात, त्यांच्या कर्तव्यात विनाकारण वादविवाद व अडथळा निर्माण झाला. बॅगांच्या तपासणीवरून सरकारी कामात वाद निर्माण व्हायला नको होता. उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्याच्या मुद्याची खिल्ली उडवताना राज ठाकरे म्हणाले, कर्मचा-याला नियुक्तीपत्र विचारले गेले. असे पत्र खिशात ठेवून कोणी फिरते का? आमच्याही बॅगा तपासल्या जातात. त्यांची कामे ते करतात. त्यासाठी इतका संताप करण्याची गरज नव्हती.

ज्यांच्या हातून कधी पैसे निघत नाहीत, त्यांच्या बॅगामध्ये काय असणार? दोन हातरुमाल आणि कोमट पाण्याची बाटली! निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने वेगवेगळे वाद निर्माण केले जात आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणतात- ‘बटेंगे तो कटेंगे’. पंतप्रधान मोदी म्हणतात- ‘एक है तो सेफ है’ अशा वक्तव्यांवरून पंतप्रधानपदावरील व्यक्ती जनतेत संभ्रम निर्माण करते असा अर्थ काढायचा का? पंतप्रधान आणि सरकार भारतीय जनतेचे संरक्षण करण्यास सक्षम नाहीत का? शिवाय कोणाला कोणापासून धोका आहे ते नाव घेऊन का सांगत नाही? कोण एकत्र राहिले नाही तर कोण त्यांना काटणार आहे ते सांगायला का घाबरता? राम मंदिराचे श्रेय घेऊ पाहणारे डिसेंबर ९२ मध्ये बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा कायद्याचे प्रश्न निर्माण झाले तेव्हा कारवाईच्या भीतीने लपून बसले होते. त्यावेळी अजिबात न भीता बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरपणे ती जबाबदारी स्वीकारली होती.

मशीद पाडली गेली म्हणून राम मंदिर उभे राहिले. त्यामुळे राम मंदिर उभारणीचे खरे श्रेय बाळासाहेब ठाकरे यांचेच आहे. बाबरी मशीद पतनानंतर मुंबईत जी दंगल उसळली तेव्हा शिवसेनेनेच मुंबई वाचवली होती. त्यावेळी ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’, म्हणणा-यांच्या उद्योगधंद्यांना शिवसेनेनेच संरक्षण दिले होते. असो. लोकसभेला दिलेल्या गॅरंट्यांचे फुगे हवेत विरले आहेत. मोफतच्या गॅरंट्या देशाला व राज्यांना कर्जबाजारी करून कंगाल बनवतात हे मतदारांच्या लक्षात आले असेल. निवडणूक काळात हजारो हातांना काम मिळाले आहे. अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. एवढे मात्र खरे! खानावळीवर गर्दी वाढली आहे. कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी जेवणावळी उठत आहेत. मंडपवाले, बँडवाले यांची चलती आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR