लातूर : प्रतिनिधी
धगधगत्या मणिपुरमध्ये जातीय संघर्ष थांबुन शांतता प्रस्थापित व्हावी, या उद्देशाने ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील कवठेकर दि. १५ जानेवारीपासून मणिपुरमध्ये शांती यात्रा काढणार असल्याची माहिती स्वत: विनायकराव पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
विनायकराव पाटील यांनी मणिपूरला या अगोदर भेट देऊन तेथील परिस्थितीचे वास्तव पाहिलेले आहे. ते म्हणाले, गेल्या १९ महिन्यांपासून मणिपुरमध्ये मैतयी व आदिवासी कुकी समुदायांमध्ये आरक्षणाच्या मुद्दावरुन जातीय संघर्ष सुरु आहे. मणिपुरमधील जातीय संघर्षाचे वास्तव खुप भयानक आणि चिंताजनक आहे. जातीय संघर्षामध्ये दोन समाजातील अनेक लोक मारले गेले आहेत. दोन्ही समुदायांनी एकमेकांची हजारो घरे जाळली. शाळासुद्धा जाळून टाकल्या. त्यामुळे लोक बेघर आणि विद्यार्थी शाळेविना आहेत. तरुण मुलांनी शाळा, कॉलेज सोडून हातात शस्त्र घेतली आहेत. महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने १५ जानेवारीला मणिपुरमध्ये म्यॉनमार या देशाच्या सीमेपासून शांती यात्रा काढणार आहे. मानवतेच्या भावनेतून मणिपुरमध्ये शांती यात्रा काढण्याचा धाडसी निर्णय घेतल्याचे विनायकराव पाटील म्हणाले.