लातूर : प्रतिनिधी
मराठवाड्यातील मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेटियर स्वीकारुन कुणबी मराठा प्रवर्गात आरक्षण द्यावे या मागणीसाठी १७ ते २४ सप्टेंबर या कालावधीत कडकडीत उपोषण केलेले ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील यांच्या प्रकृती अस्वासथ्यामुळे त्यांना लातूर शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात असून उपचार घेत असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मराठा आरक्षण या मागणीसाठी आपण देहत्याग करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे म्हटले.
मराठवाड्यातील मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेटियर स्वीकारुन कुणबी मराठा प्रवर्गात आरक्षण द्यावे या मागणीसाठी विनायकराव पाटील यांनी उमरगा तालुक्यातील कवठा येथे १७ ते २४ सप्टेंबर या कालावधीत कडकडीत उपोषण केले. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओब्बासे यांच्या मध्यस्थीने त्यांनी उपोषण मागे घेतले. बेमुदत उपोषण मागे घेतले. परंतू, उपोषणामुळे त्यांच्या किडणीला इन्फेक्शन झाले आहे. शरिरातील पांढ-या पेक्षी कमी झाल्या आहेत. प्रकृती अस्वासथ्यामुळे त्यांना लातूरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणासाठी राज्यभर ५४ महामोर्चे निघाले. त्यानंतर दि. २७ जानेवारी २०१६ रोजी विनायकराव पाटील यांनी पहिले उपोषण केले. त्यानंतर त्यांनी गेल्या वर्षभरात टप्प्या-टप्प्याने तब्बल ३९ दिवस उपोषण केले. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम झाला असला तरी त्यांनी मराठा आरक्षण या मागणीसाठी आपण देहत्याग करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे म्हटले.