लातूर : प्रतिनिधी
मराठवाड्यातील दुसरे स्वतंत्र विभागीय महसुल कार्यालय स्थापन करताना लातूर येथेच विभागीय आयुक्त कार्यालय झाले पाहिजे आणि यासाठी लातूर जिल्ह्यातील मंत्री महोदय, खासदार व आमदारांनी महाराष्ट्र शासनाकडे आग्रही भुमिका मांडावी अशी मागणी लातूर विभागीय महसुल आयुक्तालय निर्माण कृती समितीच्या वतीने करण्यात आली.
राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन लातूरकरांची आयुक्तालयाची मागणी ही केवळ भावनिक नसुन गुणवत्तेवर आधारलेली आहे. तसेच ही मागणी मराठवाड्याच्या समतोल विकासासाठी महत्त्वपुर्ण आहे. आज घडीला लातूर येथे तब्बल ३६ विभागीय कार्यालये कार्यरत असुन या कार्यालयाशी केवळ मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना हे जिल्हे सोडल्यास परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड हे सहा जिल्हे विविध विभागीय कार्यालयाने लातूरशी जोडले आहे. विभागीय आयुक्तालयासाठी आवश्यक असणारी इमारत गेली १५ वर्षापासुन तयार आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाला लातूर येथे दुसरे विभागीय आयुक्त कार्यालय स्थापन करणे सहज शक्य आहे. म्हणुन मंत्री महोदयांनी महाराष्ट्र शासनाकडे लातूर येथेच महसुल आयुक्तालय स्थापन करावे म्हणुन आग्रहाची भुमिका मांडावी, अशी मागणी महसुल आयुक्तालय निर्माण कृती समितीने केली आहे. माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे आणि आमदार रमेश अप्पा कराड यांचीही भेट कृती समितीने घेऊन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी म्हणुन आयुक्तालयासाठी शासनाकडे भुमिका मांडावी, असा आग्रह धरला.
लातूर जिल्ह्यातील सर्व आमदारांना महसुल आयुक्तालय निर्माण कृती समितीच्या वतीने भेटुन या प्रश्नावर शासन दरबारी तसेच विधानसभेत भुमिका मांडण्यासाठी आग्रह करण्यात येणार आहे. या शिष्टमंडळात प्रामुख्याने माजी आमदार वैजीनाथ शिंदे, अॅड. व्यंकट बेद्रे, अॅड. बळवंत जाधव, अॅड. अण्णाराव पाटील, अॅड. उदय गवारे, मोईज शेख, संजय मोरे, अॅड. प्रदीप गंगणे, अॅड. व्यंकट नाईकवाडे, धनराज साठे आदी उपस्थित होते.