सोलापूर : सोलापूरच्या होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून चार वर्षांचा लढा दिला. विमानसेवेतील प्रमुख अडथळे दूर करूनही दीड वर्षांपेक्षा अधिक काळ उलटला. विमानतळाचे नूतनीकरण होऊन चार महिने झाले, तरीही नागरी विमानसेवा सुरू झाली नाही. त्यामुळे सोलापूर विकास मंचच्यावतीने जिल्हा परिषदेच्या पुनम गेटसमोर गाजर आंदोलन केले.
आंदोलनादरम्यान उपोषणाद्वारे संतप्त सोलापूरकरांनी आक्रोश व्यक्त केला. आंदोलनासाठी नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आला. एआयच्या साहाय्याने व्हिडिओ आणि ऑडिओ संदेश पाठवून नागरिकांना आंदोलनाची माहिती देण्यात आली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा या आंदोलनाला पाठिंबा होता. अध्यक्ष ललित गांधी यांनी लढ्याला पाठिंबा दर्शवला. विमानसेवा सुरू न झाल्यास, लढा उभारण्याचा निर्धार सोलापूर विकासमंचने केला. आंदोलनात सोलापूर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डी. राम रेड्डी, मनसे, बहुजन सेना क्रांती, विकास मंचचे विजय जाधव, मिलिंद भोसले, केतन शहा, योगिन गुर्जर, सुहास भोसले, आनंद पाटील, दत्तात्रय अंबुरे, सुशीलकुमार व्यास, इकबाल हुंडेकरी, नरेंद्र भोसले, हर्षल कोठारी, राजीव देसाई, प्रसन्ना नाझरे, काशिनाथ भतगुणकी, अर्जुन रामगिर, सुभाष वैकुंटे उपस्थित होते.
विजय जाधव आणि मिलिंद भोसले यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे स्वीय सहायक विनोद सातव यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. लवकरच सकारात्मक पावले उचलली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.