रोम : वृत्तसंस्था
जॉर्जिया मेलोनी यांच्या नेतृत्वातील इटलीमध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील बहुतांश वाहतूकदारांनी (ट्रांसपोर्टर्स) ९ ते १२ एप्रिलदरम्यान देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात विमान कंपन्यांपासून ते रेल्वे आणि खासगी क्षेत्रातील लोकांनी भाग घेतला आहे. त्यामुळेच चार दिवस देशभरातील लोकांचे जीवन कठीण झाले आहे. मेलोनी सरकार हा संप मिटविण्याच्या दिशेने पाऊले उचलत आहे.
रेल्वे प्रवाशांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एसआय-कोबास युनियनने १० एप्रिल रोजी रात्री ९ ते ११ एप्रिल रोजी रात्री ९ पर्यंत २४ तासांचा रेल्वे संप पुकारला आहे. या गाड्या चालवणारी कंपनी ट्रेनॉर्डने म्हटले आहे की, या संपामुळे प्रादेशिक आणि लांब पल्ल्याच्या सेवांवर परिणाम होऊ शकतो. मात्र, काही अत्यावश्यक सेवा सकाळी ६ ते ९ आणि संध्याकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत सुरू राहतील.
या संपांमुळे मेलोनी सरकारसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. केवळ कामगार संघटनाच संतप्त नाहीत, तर सामान्य जनताही गैरसोयींमुळे त्रस्त आहे. वाहतूक क्षेत्रातील या अशांततेचा इटलीच्या प्रतिमेवरही परिणाम होत आहे, विशेषत: देश पर्यटन हंगामाकडे वाटचाल करत असताना हा संप पुकारल्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. आता मेलोनी सरकार या संकटातून कसा मार्ग काढते याकडे सा-यांचे लक्ष लागले आहे.