मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात भेट म्हणून देण्यात आलेला जिरेटोप घालण्यास नम्रपणे नकार दिला, जिरेटोपास श्रद्धेने वंदन करून योग्य सन्मान केला. ही कृती अतिशय स्तुत्य व स्वागतार्ह आहे, असे म्हणत खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शरदचंद्र पवार पक्षाचेच खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी फडणवीसांच्या कृत्याचे कौतुक केले आहे.
‘सामना’च्या अग्रलेखात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करण्यात आले होते. गडचिरोलीत नक्षलवादामुळे सामान्य माणसांचे बळी गेले. ‘सामना’तून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यात सतत संवाद सुरू असतो. नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणून राज्याच्या हिताचे पाऊल उचलले असेल तर कौतुकच आहे, असेही राऊत म्हणाले होते.
सुप्रिया सुळेंकडूनही फडणवीसांची प्रशंसा
‘दिवंगत नेते माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे गडचिरोलीतील कार्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे घेऊन जात असून, हे सगळ्यांसाठी चांगले आहे. माओवाद असो की दहशतवाद, याविरोधात आपण सगळेच आहोत; तसेच राज्य सरकारला मोठा जनादेश मिळाला असला तरी सध्या एकच व्यक्ती पूर्ण शक्तीने काम करीत असून, ती व्यक्ती देवेंद्र फडणवीस आहे. ते सध्या मिशन मोडवर काम करीत असून, त्यांना शुभेच्छा आहेत,’ अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांचे काल कौतुक केले होते.