37.8 C
Latur
Saturday, March 29, 2025
Homeमहाराष्ट्रविरोधी पक्षनेत्याची खुर्ची काहीकाळ रिकामी राहू द्या

विरोधी पक्षनेत्याची खुर्ची काहीकाळ रिकामी राहू द्या

मुंबई : प्रतिनिधी
विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाची खुर्ची आणखी काही काळ रिकामी राहण्याची शक्यता आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीच तसे संकेत दिले आहेत. विधानसभेत उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. त्यावेळी सभागृहात डाव्या बाजूला पहिल्या रांगेतील पहिली खुर्ची उपाध्यक्षांची असते. तर, दुस-या खुर्चीवर विरोधी पक्षनेते बसतात.

उपाध्यक्षांच्या खुर्चीवर त्या रिकाम्या खुर्चीवर आज अण्णा बनसोडे विराजमान झाले. आता त्यांच्या शेजारची खुर्ची भरा, विधानसभा अध्यक्षांची निवड करा, अशी विनंतीवजा मागणी विरोधी बाकांवरून होत होती. अन्यथा उपाध्यक्ष बनसोडे यांना एकटे वाटेल, अशी मिश्किल टिप्पणीही झाली. त्यावर, काही काळ त्यांना मोकळे बसू द्या, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. शिवाय, बाजुच्या खुर्चीचा निर्णय ज्यादिवशी अध्यक्ष घेतील, तो आम्हाला मान्य असेल, तोपर्यंत बाजुची खुर्ची काही काळ रिकामी राहू द्या, असे फडणवीस म्हणाले.

त्यावर, घाईत निर्णय घेऊ का? , असा प्रश्न नार्वेकर यांनीच विरोधी बाकांकडे पाहून केला. त्यावर विरोधी बाकांवरून काही उत्तर आले नाही. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्याच्या निवडीची काही घाई नाही, त्याला कदाचित आणखी अवकाश असल्याची चर्चा रंगली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR